गोवा राज्याने प्रवेशासाठी कोरोना नकारात्मक अहवाल बंधनकारक केल्याने गोव्यात नोकरीनिमित्त जाणार्‍यांना फटका

सावंतवाडी – गोवा सरकारने गोव्यात प्रवेश करणार्‍या प्रत्येकाला ७२ घंट्यांतील कोरोना नकारात्मक (निगेटिव्ह) असल्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक केले आहे. यातून अत्यावश्यक सेवा आणि ‘मेडिकल इमर्जन्सी’ असलेले रुग्ण यांना वगळण्यात आले आहे; परंतु प्रतिदिन सिंधुदुर्ग जिल्ह्यातून गोवा राज्यात नोकरी, व्यवसाय यांसाठी जाणार्‍यांना याचा फटका बसत आहे. मुंबई-गोवा महामार्गावर पत्रादेवी येथील गोवा पोलिसांच्या तपासणी नाक्यावर कडक तपासणी चालू करण्यात आली आहे. त्यामुळे १२ मे या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून नोकरी, व्यवसाय यांसाठी गोव्यात जाणार्‍या अनेक युवकांना कोरोना तपासणी अहवाल नसल्याने माघारी पाठवण्यात आले. यामुळे स्थानिकांमधून अप्रसन्नता व्यक्त करण्यात येत आहे.

यापूर्वी गोवा शासनाकडून सिंधुदुर्गातून गोव्यात प्रतिदिन कामधंद्यासाठी ये-जा करणार्‍यांना कोरोनाविषयीचा अहवाल आवश्यक नसल्याचे सांगण्यात आले होते; मात्र उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर गोवा शासनाने कोरानाचा नकारात्मक अहवाल सक्तीचा केला आहे.