गोव्यात दिवसभरात ७५ रुग्णांचा मृत्यू, तर  ३ सहस्र १२४ कोरोनाबाधित

चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याच्या प्रमाणात ९ टक्क्यांनी घट

पणजी – गोव्यात ११ मे या दिवशी ७५ रुग्णांचा मृत्यू झाला. दिवसभरात होणार्‍या मृत्यूची ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. दिवसभरात कोरोनाशी संबंधित ८ सहस्र ५०५ चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये ३ सहस्र १२४ नवीन रुग्ण आढळले आहेत. चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण आढळण्याचे प्रमाण २४ घंट्यांत ९ टक्क्यांनी उणावले असून ते ३६.४३ टक्के आहे. दिवसभरात २ सहस्र ४७५ रुग्ण कोरोनापासून बरे झाले, तर कोरोनाबाधित १७८ रुग्णांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ३२ सहस्र ८३६ झाली आहे.

राज्यातील १२ आरोग्य केंद्रांमध्ये १ सहस्रहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण

राज्यात मडगाव येथे सर्वाधिक २ सहस्र ८३७ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापाठोपाठ फोंडा येथे १ सहस्र ८४३ रुग्ण आहेत, गेल्या काही दिवसांपासून मडगाव आणि फोंडा येथील रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. रुग्णसंख्येत फोंडा आरोग्यकेंद्र चौथ्या स्थानावरून एका दिवसात दुसर्‍या स्थानावर पोचले आहे. त्यापाठोपाठ पणजी १ सहस्र ७८६, कांदोळी १ सहस्र ७६५, म्हापसा १ सहस्र ५७२, पर्वरी १ सहस्र ५००, पेडणे १ सहस्र ३००, कुठ्ठाळी १ सहस्र २८६, सांखळी १ सहस्र २७९, चिंबल १ सहस्र २६७, शिवोली १ सहस्र २२३ आणि वास्को १ सहस्र ५८, अशी आरोग्यकेंद्रागणिक रुग्णसंख्या आहे.

गोव्यात चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे सप्ताहातील सरासरी प्रमाण देशात सर्वाधिक

गोव्यात कोरोनाविषयक चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याचे गेल्या सप्ताहातील सरासरी प्रमाण ४९.६ होते. हे प्रमाण देशातील इतर राज्यांच्या तुलनेत  सर्वाधिक आहे. सलग दुसर्‍या सप्ताहात गोवा चाचण्यांच्या तुलनेत कोरोनाबाधित आढळण्याच्या प्रमाणात अग्रेसर राहिला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

  • दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकरला गळती

  • अग्निशमन दलाच्या जवानाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली

दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजनच्या टाकीला ११ मे या दिवशी दुपारी गळती लागली; मात्र अग्निशमन दलाच्या जवानाने सतर्क राहून वेळीच ही गोष्ट लक्षात आणून दिल्याने मोठी दुर्घटना टळली. प्राप्त माहितीनुसार कोल्हापूर येथून आलेला एक ऑक्सिजन टँकर दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजनच्या मुख्य टाकीमध्ये ऑक्सिजन भरत असतांना ऑक्सिजनच्या गळतीला प्रारंभ झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्वरित घटनास्थळी जाऊन काही मिनिटांमध्येच ही गळती थांबवली. या वेळी अग्निशमन दलाच्या एका जवानाला इजा पोचली. या घटनेनंतर दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन स्थितीचा आढावा घेतला. याविषयी एक अधिकारी म्हणाले, ‘‘या घटनेचे अन्वेषण करून याविषयी अहवाल शासनाला सुपुर्द करण्यात येणार आहे.’’