पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ३ आधुनिक वैद्यांनी खाटांसाठी कोविड रुग्ण आणि त्यांचे नातेवाइक यांच्याकडून १ लाख रुपये उकळले, तर याच ठिकाणी असलेल्या ‘स्पर्श’ रुग्णालयातील खाट उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येकी ५ सहस्र रुपये स्वीकारले जात होते. अनेक आधुनिक वैद्य औषधांच्या दुकानात भागीदार आहेत. तसेच आवश्यकता नसतांना भरमसाठ औषधे माथी मारण्याचा उद्योग चालू आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार चालू असतांना यामध्ये परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांसह काही आधुनिक वैद्यांचाही सहभाग असल्याचे मुंबई, पुणे आणि संभाजीनगर येथील विविध घटनांवरून दिसून येते. रुग्णाच्या नातेवाइकांनी कितीही प्रयत्न केले, तरी आधुनिक वैद्य देयकातील रक्कम न्यून करत नाहीत. शेवटी लोकप्रतिनिधींना दूरभाष केल्यानंतर अथवा तक्रार केल्यानंतर देयकातील रक्कम न्यून केली जाते.
आधुनिक वैद्यांना रुग्ण देव मानतो; मात्र काळ जसजसा पालटत गेला, तसतशी आधुनिक वैद्यांची स्वार्थी वृत्ती बळावत गेली. पूर्वीच्या काळी आधुनिक वैद्य स्वतःचे कर्तव्य म्हणून रुग्णांची सेवा करायचे. ग्रामीण भागातील रुग्णांकडे पैसे नसतांना त्यांनी त्यांच्या शेतातील भाजी, धान्य दिले, तरी आधुनिक वैद्य ते घेऊन समाधान मानायचे. आजच्या आधुनिक वैद्यांनी दिवंगत आधुनिक वैद्य शरदकुमार दीक्षित यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवला पाहिजे. केवळ एक हात आणि मेंदू चालत असतांनाही त्यांनी प्रतिदिन जगभरात विनामूल्य शस्त्रक्रिया केल्या. बीडमधील डॉ. राऊतमारे हेही आठवड्यातून २ दिवस विनामूल्य सेवा देतात. महाराष्ट्रातील विविध शहरांत असलेले अनेक आधुनिक वैद्य समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेने सेवा देत आहेत. बीडमधील बालरोग तज्ञांनीही सरकारी रुग्णालयात १५ दिवस सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे.
अशा आधुनिक वैद्यांकडून स्वार्थांध आधुनिक वैद्यांनी शिकायला हवे. लढाईच्या वेळी वैद्यकीय सैनिकांनी स्वतःचे शस्त्र खाली ठेवणे किंवा आपले उखळ पांढरे करून घेणे योग्य नाही. आपले कर्तव्य जाणून ते बजावत असणार्यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सर्वच आधुनिक वैद्यांनी कोरोनाशी दोन हात करण्यास कंबर कसली पाहिजे. स्वार्थांधता हा समाजहिताच्या आड येणारा मोठा शत्रू आहे, हे आधुनिक वैद्यांनी लक्षात घ्यायला हवे !
– श्री. सचिन कौलकर, मिरज