लोकप्रतिनिधींना कोरोनायोद्धे म्हणून घोषित करणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लसीकरणाला चालना देण्यासाठी व्हिडिओ कॉन्स्फरन्सिंगद्वारे २ सहस्र लोकप्रतिनिधींशी साधला संवाद

सौजन्य : GOA 365

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी १० मे या दिवशी व्हिडिओ कॉन्स्फरन्सिंद्वारे पंचायत आणि नगरपालिका मंडळ यांच्या सुमारे २ सहस्र सदस्यांशी संवाद साधला. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘लोकप्रतिनिधींना कोरोनायोद्धे म्हणून घोषित करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. कोरोनावरून मुख्यमंत्री आणि राज्यशासन यांना दोष देणे सोपे असते. दोषारोप स्वीकारण्यास आम्ही सिद्ध आहोत. राज्यशासनाला कोरोना महामारीचा हा अनुभव प्रथमच आलेला आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधीने ‘प्रतिदिन किमान १० जणांना लसीकरण करण्यासाठी प्रोत्साहन देणार’, असे ध्येय ठेवावे. राज्यात पुढील काही दिवसांत कोरोना लसीकरणाची एकूण ७४ केंद्रे कार्यान्वित होणार आहेत. ही केंद्रे सार्वजनिक सुटीच्या दिवसासह प्रतिदिन सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खुली असतील.’’

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी शासन सिद्धता करत आहे ! – मावीन गुदिन्हो, पंचायतमंत्री

राज्यशासन कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्यासाठी सिद्धता करत असल्याचा दावा पंचायतमंत्री मावीन गुदिन्हो यांनी केला आहे. राज्यशासनाने मानवी जीव वाचवण्यासाठी योग्य ती पावले उचलली आहेत, असे मंत्री मावीन गुदिन्हो पुढे म्हणाले.

राज्यात कोरोना लसीकरणाची ३७ अतिरिक्त केंद्रे आणि अंथरुणाला खिळून असलेल्यांसाठी फिरते लसीकरण केंद्र

विकलांग व्यक्ती आणि आजारपणामुळे अंथरुणाला खिळून असलेले यांच्यासाठी फिरते लसीकरण केंद्र उभारले जाणार आहे, तसेच राज्यात कोरोना लसीकरणाची ३७ अतिरिक्त केंद्रे उभारली जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांपैकी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू नाही ! – आरोग्य खात्याचा दावा

गोव्यात कोरोनाच्या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, तर कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्या एकूण ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे, असा दावा आरोग्य खात्याने केला आहे. आतापर्यंत राज्यातील ४५ वर्षांवरील ३ लाख ८५ सहस्र लोकांना लसीचे डोस देण्यात आले आहेत, तर २ लाख ४० सहस्र लोकांना डोस द्यायचे राहिले आहेत, असे आरोग्य खात्याने कळवले आहे.