दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पुन्हा घोळ !
मडगाव, १० मे (वार्ता.) – कोरोनाच्या दुसर्या लाटेत प्रतिदिन सुमारे ५० हून अधिक रुग्णांचा मृत्यू होत असल्याने आरोग्ययंत्रणा पूर्णपणे कोलमडली आहे. यातच मृतदेह हाताळण्यासाठी पुढे सरसावलेल्या व्यक्तीमुळे गोंधळात आणखी भर पडत आहे. ९ मे या दिवशी मृत व्यक्तीची व्यवस्थित ओळख पटवण्याआधीच मृतदेह दफन विधीसाठी नेल्याने संबंधितांची बरीच तारांबळ उडाली. वेर्णा येथील दफनभूमीत दफन केला जात असलेला मृतदेह पुन्हा शवागारात आणण्याची पाळी आली.
सविस्तर वृत्त असे की, कोरोनामुळे मृत पावलेल्या पतीचा मृतदेह नेण्यासाठी पत्नी आली होती. पतीने लाल रंगाचा टी-शर्ट घातल्याने मृतदेह आपल्या पतीचा असल्याचे सांगून आणि मृतदेहाची ओळख पटल्याचे संबंधित व्यवस्थापनाला सांगून मृतदेह घाईगडबडीत कह्यात घेतला आणि तो दफन करण्यासाठी त्या वेर्णा येथे जाण्यास निघाल्या. यानंतर दुसरे कुटुंब मृतदेह नेण्यासाठी आले असता, त्यांना दाखवण्यात आलेला मृतदेह त्यांचा नसल्याचे लक्षात आले.
विशेष म्हणजे दोन्ही मृत व्यक्तीच्या अंगावर लाल रंगाचा टी-शर्ट होता. वेर्णा येथे नेण्यात आलेला मृतदेह नंतर आलेल्या कुटुंबाचा असल्याचा संशय निर्माण झाल्याने तो परत आणण्यासाठी धावपळ चालू झाली. यासाठी वेर्णा पोलिसांचे सहकार्य घेण्यात आले. वेर्णा दफनभूमीत पोचलेल्या मृतदेहाचे दफन करण्याची प्रक्रिया चालू होती आणि शवपेटीवर माती टाकण्यात येत असतांनाच पोलीस दफनभूमीत पोचले. पोलिसांनी दफन केली जात असलेली शवपेटी पुन्हा वर काढण्यास सांगितले आणि त्याप्रमाणे शवपेटी वर काढून पुन्हा ती शवागारात आणण्यात आली. यानंतर मृतदेहांची पुन्हा ओळख पटवून ते नातेवाइकांना सुपुर्द करण्यात आले. यापुढे मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी मृताच्या जवळच्या व्यक्तीला उपस्थित रहावे लागणार आहे आणि व्यवस्थित ओळख पटवल्याविना मृतदेह कह्यात न देण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. कोरोनामुळे मृत्यू आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बर्याच कुटुंबातील सदस्य पुढे येत नसल्याने समस्या निर्माण झाल्याचे समजते.