सातारा, ९ मे (वार्ता.) – कोरोनाबाधित रुग्णांची संख्या हाताबाहेर जाऊ लागली आहे. १ मेपासून रुग्णसंख्या २ सहस्रच्या पुढेच वाढत चालली आहे. यापूर्वी ९ मेच्या रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात दळणवळण बंदीचे आदेश जिल्हाधिकारी यांच्याकडून देण्यात आले होते, मात्र रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्यामुळे ८ मेच्या रात्री १०.४५ वाजता प्रभारी जिल्हादंडाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी १५ मेपर्यंत दळणवळण बंदी वाढवण्यात आले आहेत, असेे आदेश पारित केले आहेत.
सातारा जिल्ह्यात दळणवळण बंदी जाहीर केल्यापासून रुग्णसंख्या वाढतच आहे. जिल्ह्यात रुग्णालयांची संख्या वाढवण्यात आली असून ऑक्सिजन प्लॅन्ट निर्मितीसाठीही प्रयत्न चालू आहेत. उपचार घेण्यासाठी बांधितांच्या आणि नातेवाइकांच्या रुग्णालयाबाहेर रांगाचरांगा लागत आहेत. काही रुग्णालयात बेड शिल्लक नाहीत, बेड आहेत तर ऑक्सिजन नाही अशी स्थिती आहे. याविषयी प्रशासन आणि आरोग्य विभागाने मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे. ८ मे या दिवशी जिल्ह्यात बाधितांची संख्या २ सहस्र ३७९ होती, तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १ सहस्र ९३६ होती. या दिवशी ४४ बाधितांचा मृत्यू झाला.