देवच आधार आहे !

नुकताच सामाजिक माध्यमावर एक व्हिडिओ प्रसारित झाला, ज्यात एका कोविड सेंटरमधील रुग्ण आणि कर्मचारी हात जोडून ‘एक तूही भरोसा’ हे प्रार्थनागीत म्हणत आहेत. सध्या देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वत्र भय, नैराश्य आणि मृत्यूचे सावट पसरले आहे. एकीकडे कोरोनाचा धोका, तर दुसरीकडे मनोबल कमकुवत होत चालल्याने आत्महत्या आणि हृदयविकार यांचे प्रमाणही वाढले आहे. अशा परिस्थितीत प्रार्थनागीताचा प्रसारित झालेला व्हिडिओ बरेच काही सांगून जाणारा आहे. ‘या भयावह स्थितीत भगवंतच सक्षम आधार आहे’, हे सत्य यातून प्रतीत होते. सध्या गायत्री मंत्राचा कोरोनावर काय परिणाम होतो ? यावर संशोधन करण्यात येणार आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध नागक्षेत्र कुक्के सुब्रह्मण्य येथे कोरोनाच्या नियंत्रणासाठी १ आठवडा धन्वन्तरि याग करण्यात येणार आहे. भारतातील कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी इस्रायलमधील ज्यूंकडून ‘ॐ नम: शिवाय’ हा जप आणि प्रार्थना, तर अमृतवेला ट्रस्टच्या वतीने भारतासह जगभरातील ५०० केंद्रांवर कोरोनाचे संकट नष्ट करण्यासाठी नामजप करण्यात येत आहे. थोडक्यात अनेक जण आता कोरोनापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवंताला साकडे घालत आहेत.

कोरोना महामारीच्या माध्यमातून नागरिकांना आपत्काळाची झळ बसत आहे. यापुढील काळ तर याहून भयावह असणार आहे. या काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त होणेच आवश्यक आहे. त्यासाठी भगवंतावरील श्रद्धा आणि भक्ती वाढवायला हवी. श्रद्धा आणि भक्ती यांमुळे आपले आध्यात्मिक बळ वाढून सकारात्मकता वाढेल. ज्या ज्या वेळेस भक्त भगवंताला आर्ततेने हाक मारतो, त्या वेळेस भगवंत भक्तासाठी धावून येतो, याची असंख्य उदाहरणे आहेत. देव भावभक्तीचा भुकेला आहे आणि मनापासून केलेली प्रार्थना त्याच्यापर्यंत पोचते.

सध्या समाज भगवंताकडे याचना करत आहे, हे योग्य दिशेने पडलेले एक पाऊल आहे. आता यापुढचा टप्पा म्हणजे, प्रत्येकाने साधनेला आरंभ करायला हवा. आजपर्यंत जोपासलेल्या निधर्मीपणाच्या बेड्या झुगारून आता शासकीय पातळीवर समाजाला धर्मशिक्षण आणि साधना शिकवणारे उपक्रम राबवायला हवेत. असे झाल्यास समाज सक्षमतेने आलेल्या आणि येणार्‍या संकटांना सामोरा जाऊ शकतो, हे निश्चित !

– सौ. अपर्णा जगताप, पुणे