१. सप्तपाताळ आणि सप्तलोक
‘आदिशक्तीच्या संकल्पाने भगवान शिवाने सृष्टीची निर्मिती केली.
१ अ. भू (पृथ्वी) : जिवाने भोग भोगून ईश्वरप्राप्ती करण्याचे हे स्थान आहे.
१ आ. भुवर्लोक : मृत्यूनंतर राहिलेल्या अतृप्त इच्छांमुळे भटकण्याचे हे स्थान आहे. हे पृथ्वी आणि स्वर्ग यांच्या मध्ये आहे.
१ इ. स्वर्गलोक : हे मनुष्यजीवनात केलेल्या दैदीप्यमान पुण्याचे फळ भोगण्याचे स्थान आहे.
१ ई. महर्लोक : ‘प्रारब्ध संपल्यावर केवळ ईश्वरप्राप्तीसाठी जीव’, ही संकल्पना जागृत असलेले हे स्थान आहे.
१ उ. जनलोक : येथे केवळ संकल्पाने सृष्टीचे कल्याण करण्याचे सामर्थ्य असणारे संत वास करतात.
१ ऊ. तपोलोक : येथे सृष्टीरचनेसाठी तपःसामर्थ्य वापरले जाते. येथे केवळ प्रकाशभाषा असते. येथे दिव्य देह प्रकाशमान आणि गोलाकार रूपात असतात; कारण ब्रह्मांडाचा आकार गोल आहे. या लोकातील जीव व्यापक असून ते ब्रह्मांडाचे प्रतिनिधित्व करतात.
१ ए. सत्यलोक : यालाच ‘गोलोक’ किंवा ‘विष्णुलोक’, असेही म्हणतात. अंतिम ध्येयाच्या प्राप्तीसाठी जीव या लोकात चिरंतन वास करतात. जीव आणि शिव यांचे मीलन याच लोकात होते.
२. मनुष्याच्या शरिरातील सप्तचक्रे आणि सप्तलोक यांचा संबंध
मनुष्याच्या शरिरातील सप्तचक्रे म्हणजेच सप्तलोक आहेत. जेव्हा मनुष्याच्या एखाद्या चक्राची जागृती होते, तेव्हा त्या चक्राशी संबंधित लोकातील वातावरण मनुष्याला अनुभवायला मिळते.
३. मूलाधारचक्राची रचना
मूलाधारचक्राची रचना अत्यंत जटील आहे. मूलाधारचक्र २ भागांत विभागले आहे. त्याच्या वरच्या बाजूला सप्तलोक असून मध्यभागी शुक्राचार्यऋषींचा वास आहे. शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु असून त्यांच्यात सप्तपाताळ सामावले आहे. ते ब्रह्मदेवाचे पुत्र आहेत.
३ अ. मनुष्याच्या जन्मपत्रिकेतील ‘शुक्र’ या ग्रहाच्या स्थानाचे महत्त्व : ‘माणसाच्या जन्मपत्रिकेत शुक्र हा ग्रह कोणत्या स्थानी आहे ?’, यावरून त्याचा जीवनप्रवास ठरतो. शुक्र ग्रह चांगल्या स्थानी असेल, तर तो मनुष्य भौतिक सुख मिळवून आध्यात्मिक प्रगती करू शकतो. शुक्र या ग्रहाची स्थिती बिघडलेली असेल, तर मनुष्याचे अधःपतन होते. त्यामुळे आध्यात्मिक उन्नतीसाठी शुक्र या ग्रहाची स्थिती चांगली असणे आवश्यक आहे.
४. प्राणीजीवनाचे प्रतिनिधित्व करणारी आणि ‘शक्तितत्त्व चराचरात व्यापून आहे’, हे सिद्ध करणारी पृथ्वी !
सप्तलोकातील पृथ्वी ही प्राणीजीवनाचे प्रतिनिधित्व करते. पृथ्वीवर जलतत्त्व ७१ टक्के असून भूभाग २९ टक्के आहे. मनुष्याचे शरीरही रक्तरूपी जलाने भरले आहे. ते लाल आहे; कारण शक्तितत्त्वाचा रंग लाल आहे. मनुष्याच्या अंगात रक्त नसेल, म्हणजेच शक्ती नसेल, तर तो मृतावस्थेस प्राप्त होतो. येथे पुन्हा एकदा ‘शक्तितत्त्व चराचरात व्यापून आहे’, हे सिद्ध होते.
५. पंचभौतिक तत्त्वांचे पृथ्वीच्या संचलनात मोलाचे योगदान असणे
पृथ्वी, आप, तेज, वायु आणि आकाश ही तत्त्वे पृथ्वीच्या संचलनासाठी कार्यरत असून मनुष्याच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान आहे. ही पंचतत्त्वे केवळ पृथ्वीवर आणि तिच्यापासून काही अंतरावर आढळतात. त्यापुढे सर्वकाही ‘निःशब्द, निर्गुण, निराकार, निरंग (रंग नसलेले)’, अशा प्रकारे अस्तित्वात आहे; पण दैवी देह त्यांच्या आध्यात्मिक पातळीनुसार प्रकाशमान दिसतात. मनुष्याला सगुण भाषा कळते; म्हणून तो आकार धारण करतो.
अशा प्रकारे पिंड (जीव) आणि ब्रह्मांड (सृष्टी) एकसमान आहे.’
– अधिवक्त्या (सौ.) किशोरी कुलकर्णी, अंबरनाथ, ठाणे. (४.२.२०२४)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |