रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात झालेल्‍या ‘साधनावृद्धी शिबिरा’त सहभागी झालेल्‍या शिबिरार्थींना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

१ ते ३.३.२०२४ या कालावधीत रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमात ‘साधनावृद्धी शिबिर’ झाले. त्‍या शिबिरात सहभागी झालेल्‍या शिबिरार्थींना आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

गोवा येथील सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

१.  कु. प्रणिता कुलकर्णी, संभाजीनगर, महाराष्‍ट्र.

अ. ‘मी आश्रम पहात असतांना ‘श्रीकृष्‍ण चैतन्‍य प्रदान करत आहे’, असे मला जाणवले.

आ. स्‍वागतकक्षातील श्रीकृष्‍णाच्‍या चित्राकडे पाहिल्‍यावर ‘श्रीकृष्‍ण माझ्‍याकडे पाहून स्‍मितहास्‍य करत आहे’, असे मला जाणवले.’

२. कु. पूर्वा संजय वाकचौरे, अहिल्‍यानगर, महाराष्‍ट्र.

२ अ. शिबिराला जाण्‍यापूर्वी मनात नकारात्‍मक विचार येणेे : ‘मला शिबिराला जायची संधी मिळाली होती. माझी १५ दिवसांनी परीक्षा होती. मी शिबिराला जाण्‍यापूर्वी माझ्‍या मनात ‘शिबिराला गेल्‍यास माझा अभ्‍यास होणार नाही आणि मला प्रश्‍नपत्रिका चांगल्‍या प्रकारे सोडवता येणार नाही’, असे विचार येत होते. माझ्‍या मनातील हे विचार मी उत्तरदायी साधक श्री. रामेश्‍वर भुकन यांना सांगितले. त्‍या वेळी त्‍यांनी मला समजावून सांगितले, ‘‘आपण भगवंताकडे १ पाऊल टाकले, तर भगवंत आपल्‍याकडे १० पावले चालून येतो.’’ त्‍यानंतर मी रामनाथी आश्रमात शिबिराला गेले. त्‍या वेळी आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून ध्‍यान करत असतांना मला या संदर्भातील अनुभूतीही आली.

२ आ. रामनाथी आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून नामजप करतांना चित्र स्‍वरूपात अभ्‍यास लक्षात येणे आणि देवाप्रती कृतज्ञताभाव अन् श्रद्धा यांत वृद्धी होणे : एकदा मी रामनाथी आश्रमातील ध्‍यानमंदिरात बसून नामजप करत होते. मी प्रवासात केलेला अभ्‍यास चित्र स्‍वरूपात (‘Picture Format’) माझ्‍या डोळ्‍यांसमोर येत होता. मी एकपाठी नाही, तरीही केवळ एकदाच वाचलेले धडे मला आठवत होते. प्रत्‍यक्षात मी ३ – ४ वेळा वाचन केल्‍यावरच धडे माझ्‍या लक्षात रहातात. या अनुभूतीतून मला जाणीव झाली, ‘देव माझ्‍याकडे १० पावले चालून आला आहे.’ तेव्‍हा माझ्‍या मनातील देवाप्रती कृतज्ञताभाव अन् श्रद्धा यांत वृद्धी झाली.’

३. श्रीमती सरोजिनी संजय मकोटे, ईश्‍वरपूर, तालुका वाळवा, जिल्‍हा सांगली, महाराष्‍ट्र.

अ. ‘मी आश्रमात प्रवेश करताक्षणी मला गुरुदेवांचे (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांचे) स्‍मरण झाले. ‘गुरुदेव माझ्‍या समवेत आहेत’, असे मला जाणवत होते.

आ. मी आश्रम पहात असतांना मला आश्रमातील चैतन्‍याचा लाभ होत होता.

इ. माझे मन प्रत्‍येक साधकामधील भाव पाहून आनंदी होत होते आणि मला त्‍याच्‍यात गुरुतत्त्व जाणवत होते.

ई. श्री दुर्गादेवीचे चित्र पहातांना ‘श्री दुर्गादेवीच्‍या चित्रातून माझ्‍याकडे तेजतत्त्व येत आहे’, असे मला जाणवले.

उ. भगवान श्रीकृष्‍णाच्‍या चित्राकडे पाहून माझी भावजागृती होत होती. ‘साक्षात् श्रीकृष्‍ण माझ्‍यासमोर उभा आहे’, असे मला जाणवत होते. मी प्रार्थना करत असतांना मला श्रीकृष्‍णाच्‍या मुकुटातील मोरपीस हलल्‍यासारखे जाणवले. तेव्‍हा ‘श्रीकृष्‍णाने माझी प्रार्थना स्‍वीकारली’, असे वाटून माझा भाव जागृत झाला.

ऊ. प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या छायाचित्राकडे पाहून माझा भाव जागृत होत होता. त्‍यांना नमस्‍कार केल्‍यावर ‘माझ्‍या आज्ञाचक्रातून चैतन्‍य शरिरात जात आहे’, असे मला जाणवले.

ए. ‘शिबिरात गुरुदेव आम्‍हाला शिकवत आहेत’, असे मला जाणवत होते.’

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक