श्री भवानीदेवीचे रामनाथी आश्रमात शुभागमन होतांना आणि प्राणप्रतिष्ठापनेचे विधी करतांना सनातन पुरोहित पाठशाळेतील पुरोहितांना आलेल्या अनुभूती !

सनातन पुरोहित पाठशाळेच्या वर्धापनदिनानिमित्त…

वस्त्रालंकारांनी सजवलेली श्री भवानीदेवीची मूर्ती

रामनाथी आश्रमात श्री भवानीदेवीची विधीपूर्वक प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. त्या वेळी त्या सोहळ्याच्या सेवेत सहभागी झालेल्या पुरोहितांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. श्री. अमर जोशी

१ अ. त्रासदायक अनुभूती

१. ‘यज्ञाचा संकल्प, पूजन आदी विधी होईपर्यंत मला सेवा करायला उत्साह होता; मात्र हवनासाठी आल्यावर पायाच्या स्नायूंमध्ये गोळे येणे, अकस्मात् तीव्र पाठदुखी होणे, असे त्रास होऊ लागले.

१ आ. चांगल्या अनुभूती

१. यज्ञाच्या सिद्धतेची सेवा करतांना नेहमीपेक्षा अधिक उत्साह जाणवत होता. ‘सेवा शारीरिक स्तरावर न होता चैतन्याच्या स्तरावर होत आहे’, असे वाटत होते.

२. देवीची मूर्ती स्थापन झाल्यानंतर मूर्तीमध्ये सजीवपणा जाणवत होता आणि ‘देवीचे पूजन करतांना देवी तिथे उपस्थित आहे’, असे वाटत होते.’

२. श्री. सिद्धेश करंदीकर

२ अ. रामनाथी आश्रमात देवीचे आगमन होत असतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी तिची पूजा केल्यावर देवीचा तोंडवळा हसरा दिसणे : ‘या दिवशी श्री भवानीदेवीचे रामनाथी आश्रमात आगमन झाले. त्या वेळी आगमनाप्रीत्यर्थ देवीची भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. देवीला सजवलेल्या गाडीत ठेवले होते. श्रीसत्शक्ति बिंदाताईंनी (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी) देवीची पूजा केली, तेव्हा मला देवीचा तोंडवळा पूर्वीपेक्षा हसरा वाटला. त्या प्रसंगी मंत्र म्हणत असतांना मला एकदम शांत वाटत होते.

२ आ. श्री भवानीदेवीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा विधी चालू असतांना देवीचे चैतन्य सहन न होणे, काही वेळाने श्रीसत्शक्ति बिंदाताई यज्ञस्थळी आल्यावर देवीचे चैतन्य आधी त्यांच्याकडे जाऊन नंतर ते प्रक्षेपित होऊ लागल्यामुळे ते चैतन्य सहन करता येणे, तेव्हा श्रीसत्शक्ति बिंदाताई देवीस्वरूप असल्याची प्रचीती येणे : श्री भवानीदेवीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या विधीत पहिल्या दिवशी देवीची मूर्ती यज्ञकुंडाच्या समोर ठेवली होती. हवनाच्या वेळी मी देवीच्या समोरच बसलो होतो. तेव्हा देवीकडून मोठ्या प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होत असल्याने काही वेळाने मला ते सहन होईना. त्यामुळे माझे डोके फार दुखायला लागले. काही वेळाने श्रीसत्शक्ति बिंदाताई यांचे यज्ञस्थळी आगमन झाले. त्या वेळी ज्याप्रमाणे शिवमंदिरात शिवपिंडीसमोर नंदी असतो. त्यामुळे शिवाची शक्ती थेट आपल्याकडे न येता ती नंदीकडून आपल्याला मिळते, त्याचप्रमाणे श्रीसत्शक्ति बिंदाताई यज्ञकुंड स्थळी आल्यावर देवीची शक्ती आधी श्रीसत्शक्ति बिंदाताईंकडे जाऊन मग माझ्याकडे येत होती. त्यामुळे मला देवीचे चैतन्य सहन करता येऊ लागले. यावरून ‘श्रीसत्शक्ति बिंदाताई साक्षात् देवीस्वरूप आहेत’, याची मला अनुभूती आली.

२ इ. श्री भवानीदेवीच्या आश्रमातील आगमनाच्या दुसर्‍या दिवशी पुष्कळ थकवा येणे, पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर थकवा न्यून होणे : श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापनेच्या सोहळ्यातील दुसर्‍या दिवशी सकाळी मला फार थकवा आला होता आणि माझा तोल जात होता; म्हणून मी पू. डॉ. मुकुल गाडगीळ यांना मला होणारा त्रास सांगितला. तेव्हा त्यांनी सांगितल्याप्रमाणे काही वेळ नामजप केल्यावर माझा त्रास न्यून झाला. त्यानंतर मी देवीच्या सेवेसाठी गेल्यावर १० मिनिटांत माझा सगळा त्रास निघून गेला आणि मी दिवसभर सेवा करू शकलो.

२ ई. श्रीसत्शक्ति बिंदाताईंनी पुरोहितांना ‘तुम्ही अंतरातून केवळ कृतज्ञताभाव ठेवला, तरी तुमची साधनेत प्रगती होईल’, असे सांगणे : श्रीसत्शक्ति बिंदाताई आम्हा पुरोहितांना म्हणाल्या, ‘‘जगात कितीतरी पुरोहित असतील; परंतु हिंदु राष्ट्र आणि आपले गुरुदेव यांच्यासाठी यज्ञ करण्याची संधी केवळ तुम्हाला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही सनातनचे सगळे पुरोहित फारच भाग्यवान आहात. तुम्ही तुमच्या अंतरात केवळ कृतज्ञ रहा. त्यामुळे तुमची साधनेतही प्रगती होईल.’’

३. श्री. ईशान जोशी

३ अ. श्री भवानीदेवीचे रामनाथी आश्रमात आगमन होतांना तिचे तत्त्व फार मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होत असल्याचे जाणवून ते पेलवत नसल्यामुळे अंग कंपित होणे आणि ‘देवीसह पूर्ण देवीलोकच आश्रमात आला आहे’, असे जाणवणे : ‘आई भवानीदेवीचे रामनाथी आश्रमात आगमन होणार होते. त्या वेळी मला शंखनाद करण्याची सेवा मिळाली होती. मला देवीचे आश्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारातून आगमन झाल्यापासून ते देवीची पूजा चालू होईपर्यंत सलग १० मिनिटे शंखनाद करायचा होता. या आधी मी बर्‍याच वेळा सलग शंखनाद केला आहे; पण त्या दिवशी शंखनाद करायला आरंभ केल्यापासून ते शेवटपर्यंत माझ्या शरिराला पुष्कळ कंप सुटला होता. त्या कंपामुळे मला सरळ उभेही रहाता येत नव्हते, एवढा तो कंप तीव्रतेने होत होता. त्या वेळी मला देवीची शक्ती प्रचंड प्रमाणात जाणवत होती आणि आश्रमात केवळ देवीचे आगमन झाले नसून संपूर्ण देवीलोकच येथे अवतरला आहे’, असे जाणवले.

३ आ. श्री भवानीदेवीची तारक-मारक रूपे स्पष्टपणे अनुभवता येणे : दुसर्‍या दिवशी श्री भवानीदेवीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या अंतर्गत पूजा आणि हवन चालू होते. तेव्हा मला देवीची तारक आणि मारक तत्त्वे अनुभवता आली. मला मधेच देवीचे भाव मारक दिसायचे, तर कधी ती तारक भावात हसतांना दिसायची.

३ इ. वझेगुरुजी देवीचे मंत्र भावपूर्णपणे म्हणत असतांना श्री भवानीदेवीचे तत्त्व गतीने वातावरणात पसरत असून चैतन्याचा स्रोत अंगावर येत असल्याचे  जाणवणे : श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापनेेची वेळ जशी जवळ आली आणि मंगलाष्टक चालू झाले, तसे वातावरण स्तब्ध झाले. ‘आई भवानीमातेचे तत्त्व संपूर्ण पृथ्वीवर फार वेगाने येत आहे आणि सर्वत्र पसरत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी वातावरण पूर्ण शांत झाले होते. वझेगुरुजी भावपूर्ण मंत्र म्हणत असतांना मी डोळे मिटून शांत बसलो होतो. त्या मंत्रांनी मला एकदम ध्यानात नेले. ‘प्रचंड चैतन्याचा स्रोतच अंगावर येत असून माझे शरीर दगडासारखे निश्‍चल झाले आहे’, असे मला जाणवले.

३ ई. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा तोंडवळा नेहमीपेक्षा अधिक तेजस्वी दिसणे : देवीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या वेळी श्रीसत्शक्ति बिंदाताई (श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ) तेथे आई भवानीमातेच्या समोर बसल्या होत्या. त्या वेळी त्यांचा तोंडवळा एरव्हीपेक्षा प्रचंड प्रमाणात तेजस्वी दिसत होता. तेव्हा जणूकाही ‘एक देवी दुसर्‍या देवीचे स्वागत आणि आदरातिथ्य करून तिची स्थापना करत आहे’, असे वाटले.

३ उ. श्री भवानीदेवीचे षोडशोपचार पूजन आणि अभिषेक करण्याची संधी देऊन देवीने इच्छापूर्ती करणे अन् यानंतर देवीचे तेज अधिकच वाढल्याचे जाणवणे : श्री भवानीदेवीच्या प्राणप्रतिष्ठापनेनंतर मला देवीची षोडशोपचार पूजा करण्याची संधी मिळाली. त्या अंतर्गत मी देवीला अभिषेक करतांना मला फार आनंद होत होता. काही वर्षांपूर्वी देवी आश्रमात आली होती. तेव्हा ‘देवीला अभिषेक करण्याची मला एकदा तरी संधी मिळावी’, अशी माझ्या मनात इच्छा होती. देवीच्या प्राणप्रतिष्ठापनेच्या दिवशीच देवीला अभिषेक करण्याची संधी देऊन देवीने माझी इच्छा पूर्ण केली. मला त्याचा फार आनंद होत होता. अभिषेक केल्यावर देवीचे तेज अधिकच वाढल्याचेे जाणवले. देवीची षोडशोपचार पूजा करतांना मला देवीच्या अनुसंधानात रहाता आले आणि आनंद अन् चैतन्य मिळाले.

३ ऊ. श्री भवानीदेवीला नैवेद्य ग्रहण करण्यासाठी प्रार्थना केल्यावर ‘मी नैवेद्यासमवेत साधकांचे त्रासही ग्रहण करत आहे’, असे देवीने सांगणे : देवीला नैवेद्य दाखवतांना मी देवीला मनातून म्हणालो, ‘हे देवी, तू हा नैवेद्य ग्रहण कर.’ तेव्हा देवीने उत्तर दिले, ‘अरे, मी हा नैवेद्य ग्रहण करत नसून या माध्यमातून साधकांचे त्रासच ग्रहण करत आहे.’ त्यानंतर ‘देवी नैवेद्य ग्रहण करत आहे’, असे मला स्पष्टपणे जाणवले. ही अनुभूती लिहितांना पुन्हा देवीचे ‘ते बोल’ आठवूनही मला चैतन्य मिळत होते.

३ ए. ‘पूर्णाहुतीचे मंत्र संपू नये’, असे वाटणे : पूर्णाहुती साधारण ४५ मिनिटे चालू होती. त्या वेळी ‘ते मंत्र संपूच नयेत आणि ते चालूच रहावेत’, असे मला वाटत होते.

३ ऐ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्री भवानीदेवी या दोघी एकच आहेत’, असा विचार मनात येणेे अन् त्या वेळी एका साधकाने श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीने ‘श्री भवानीदेवी आणि श्रीसत्शक्ति बिंदाताई या एकच आहेत’, असे सांगितल्याचे ऐकून लगेचच त्याची प्रचीती येणे : देवीची पूजा झाल्यावर मी देवीला विचारले, ‘श्रीसत्शक्ति बिंदातार्ई आणि तू एकच आहेस’, हे मला बुद्धीने ठाऊक आहे; पण ते माझ्या मनाला कधी कळणार ?’ यावर देवीने उत्तर दिले, ‘तू मला प्रतिदिन एकदातरी मनापासून हाक मार. मी आपोआप तुझ्या मनात येईन आणि तुझ्या मनाला आम्ही दोघी म्हणजे श्रीसत्शक्ति बिंदाताई आणि मी (आई भवानीदेवी) एकच आहोत’, याची अनुभूती येईल.’ देवीच्या आज्ञेप्रमाणे मी त्या क्षणीच देवीला मनापासून हाक मारली. त्या वेळी माझी भावजागृती होऊन माझे डोळे पाणावले. मी यज्ञकुंडाकडे आलो, तेव्हा तिथे आरतीची सिद्धता चालू होती. आरतीची सिद्धता होईपर्यंत श्री. अभिषेक पै साधकांना सांगत होते, ‘श्री विद्याचौडेश्‍वरीदेवीने सांगितले आहे, ‘श्रीसत्शक्ति बिंदाताई आणि आई भवानीदेवी एकच आहेत.’ त्यांचे वरील वाक्य ऐकून मला देवीच्या वचनाची प्रचीती आली आणि फार कृतज्ञता वाटली.

३ ओ. श्रीसत्शक्ति बिंदाताईंनी पुरोहितांना नमस्कार केल्यावर ‘पुरोहितांचीच शुद्धी होत आहे’, असे जाणवणे : श्री भवानादेवीच्या प्राणप्रतिष्ठापनेचे सर्व धार्मिक विधी यथासांग पार पडल्यावर श्रीसत्शक्ति बिंदाताईंनी पुरोहितांना नमस्कार केला. तेव्हा मला माझ्या शरिरात एक शक्ती गेल्यासारखे जाणवून फार हलके वाटले. ‘श्रीसत्शक्ति बिंदाताईंनी आम्हा पुरोहितांना नमस्कार केल्यावर आमचीच शुद्धी होत आहे’, असे माझ्या लक्षात आले.

आई भगवती भवानीदेवीच्या कृपेनेच मला वरील अनुभूती आल्या. त्यासाठी आई भवानीदेवी, परात्पर गुरु डॉक्टर आठवले आणि श्रीसत्शक्ति बिंदाताई यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’ (२३.१.२०२०)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.