१. सद्गुरु सिरियाक वाले यांच्या कपाळावर त्रिशूळ उमटलेला दिसणे आणि ‘सूक्ष्मातून शिव किंवा श्री दुर्गादेवी त्यांचे रक्षण करण्यासाठी उपस्थित आहेत’ असे जाणवणे
‘२२.३.२०२० या दिवशी कोरोना विषाणूच्या संदर्भातील पहिल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात सद्गुरु सिरियाक वाले मार्गदर्शन करत असतांना मला त्यांच्या कपाळावर त्रिशूळ उमटलेला दिसला. यावरून ‘सूक्ष्मातून शिव किंवा श्री दुर्गादेवी त्यांच्या समवेत आहेत आणि त्यांचे रक्षण करत आहेत’, असे मला जाणवले. मला सद्गुरु सिरियाक यांच्याभोवती चैतन्याची प्रभावळ दिसली. ‘ते बोलत असतांना ही प्रभावळ वाढत आहे’, असे मला जाणवले.
२. ‘ऑनलाईन’ कार्यक्रमात जिज्ञासू आणि साधक यांच्या प्रश्नांना उत्तरे देतांना सद्गुरु सिरियाक यांच्या तोंडावळ्याचा रंग पालटून कधी गुलाबी, तर कधी लालसर होणे
एप्रिल मासाच्या आरंभी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांत जिज्ञासू आणि साधक साधनेच्या संदर्भात प्रायोगिक स्तरावरील प्रश्न विचारत होते. त्या प्रश्नांची उत्तरे देतांना सद्गुरु सिरियाक यांचा तोंडवळा गुलाबी रंगाचा होत असे. त्या वेळी त्यांच्यातील तारक तत्त्व कार्यरत झाल्याने असे झाल्याचे मला जाणवले. साधनेशी संबंधित नसलेल्या किंवा अनावश्यक प्रश्नांची उत्तरे देतांना त्यांच्यातील मारक तत्त्व कार्यरत झाल्याने त्यांच्या तोंडवळ्याचा रंग पालटून लाल होत असे.
३. सद्गुरु सिरियाक यांच्या कपाळावर पोकळ वर्तुळ दिसणे आणि हे ‘त्यांचे आज्ञाचक्र उघडल्याचे प्रतीक आहे’, असे जाणवणे
७.४.२०२० या दिवशी मी सद्गुरु सिरियाक यांच्याशी भ्रमणसंगणकावरून बोलत होते. त्या वेळी मला त्यांच्या कपाळावर काहीतरी दिसले. मी त्यांना भ्रमणसंगणकावरील छायाचित्रकाच्या जवळ येण्यास सांगितले आणि त्यांच्या कपाळाचे छायाचित्र काढले. त्या छायाचित्रात मला सद्गुरु सिरियाक यांच्या कपाळावर एक गोल खड्डा (वर्तुळाकार पोकळी असल्याचे) दिसले. ‘ही पोकळी म्हणजे त्यांचे आज्ञाचक्र उघडले असून त्यातून चैतन्य प्रवाहित होत आहे’, असे मला जाणवले. त्यांच्या कपाळावर मला अग्नि, कमळ, ॐ आणि श्री विठ्ठल यांचे आकारही दिसले.’
– एस्.एस्.आर्.एफ्.च्या साधिका सौ. योया वाले (१७.४.२०२०)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |