सकाळी मृत घोषित केलेल्या रुग्णाला कुटुंबीय न्यायला आले असता तो जिवंत असून त्याच्यावर उपचार चालू असल्याचे उघड !
एका रुग्णाला छातीत दुखत असल्याने आणि तो कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. रुग्णाच्या कुटुंबियांना ३० एप्रिलला सकाळी त्यांच्या रुग्णालयात उपचार घेत असलेला रुग्ण दगावल्याचा संदेश आला. संदेश आल्यानंतर रुग्णाच्या कुटुंबियांनी रुग्णाच्या अंत्यविधीसाठी मठग्रामस्थ सभेच्या स्मशानभूमीशी संपर्क साधला. अंत्यविधीसंबंधी सर्व सिद्धता झाल्यानंतर रुग्णाचा मुलगा सायंकाळी रुग्णालयाच्या शवागारात रुग्णाचा मृतदेह कह्यात घेण्यासाठी गेला. या ठिकाणी मुलाला शवागारातील कर्मचार्याने दाखवलेला मृतदेह त्याच्या वडिलांचा नाही, असे लक्षात आले.
मुलाने त्वरित सरकारी नोकर असलेल्या त्याच्या काकांना संपर्क साधला. काकांनी मृतदेह गायब झाल्याच्या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी रुग्णालयाच्या शवागारात धाव घेतली. शवागार व्यवस्थापनाला प्रारंभी ‘मृतदेहांची अदलाबदल झाली असावी’, असे वाटले; परंतु नंतर शवागाराचे प्रमुख डॉ. मधू घोडकिरेकर यांनी त्यांच्या विभागातील एका व्यक्तीला रुग्णालयाच्या संबंधित वॉर्डमध्ये रुग्ण तपासणी करण्यासाठी पाठवले असता संबंधित रुग्ण जिवंत आहे आणि त्याच्यावर रुग्णालयात उपचार चालू असल्याचे ध्यानात आले. डॉ. मधू घोडकिरेकर यांनी या सर्व प्रकरणाचा अहवाल सिद्ध केला असून हा अहवाल जिल्हा रुग्णालय व्यवस्थापनाला पाठवला जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी कागदपत्रांचा घोळ झाला कि अन्य कुठे गोंधळ झाला, याविषयी अन्वेषण चालू आहे.
मी रुग्णालयात भूमीवर झोपण्यास सिद्ध आहे; पण माझ्यावर उपचार करा ! – रुग्णाची दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाला विनवणी
मी रुग्णालयात भूमीवर किंवा रुग्णालयातील एखाद्या कोपर्यात झोपण्यास सिद्ध आहे; पण मला रुग्णालयात भरती करून घ्या आणि माझ्यावर उपचार करा. मला होत असलेल्या वेदना सहन होत नाहीत, अशी विनवणी एका रुग्णाने दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडे केली. दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय, तसेच इ.एस्.आय. ही कोरोना रुग्णालये रुग्णांनी पूर्णपणे भरलेली आहेत.
दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात खाटांची कमतरता असल्याने अनेक रुग्णांवर भूमीवर झोपलेल्या स्थितीतच उपचार केले जात आहेत, तसेच दुसर्या बाजूने रुग्णालयातील वैदकीय कर्मचार्यांवरही कामाचा अतिरिक्त ताण आलेला असल्याने रुग्णालयात येणारे रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक यांच्या प्रश्नांना कोणाकडूनच उत्तरे मिळत नसल्याच्या बहुतेकांच्या तक्रारी आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिल्यास सर्वांवरच उपचार करणे रुग्णालय प्रशासनाला शक्य होणार नसल्याचे वैद्यकीय कर्मचार्यांचे म्हणणे आहे. प्राप्त माहितीनुसार दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकार्यांनी रुग्णालयाला भेट देऊन तेथील स्थितीचा आढावा घेतला.