वाघ वाघासारखे बोलले !

कोरोनाच्या संकटकाळात साहाय्याचे सहस्रो हात पुढे येत आहेत. अनेकजण कुणा ना कुणाचा आधार ठरत आहेत. साहाय्याची ही शृंखला दिवसेंदिवस वाढतच आहे. अशीच एक घटना घडली नागपूरमध्ये ! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ८५ वर्षीय ज्येष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर कोरोनाबाधित असल्याने रुग्णालयात उपचार घेत होते. एका तरुण कोरोनाबाधिताला वाचवण्याच्या उदात्त हेतूने त्यांनी स्वतःचा बेड सोडला आणि घरी परतले.  लक्षात घ्या, येथे प्रसंग बाका आहे ! ‘सर्वत्र ऑक्सिजन बेडची अनुपलब्धता आहे. अशात तो मिळाला असतांना तो सोडला, तर प्राणावर बेतेल’, हे ठाऊक असतांनाही दाभाडकर यांनी केवळ तरुणाचे प्राण वाचवण्यासाठी तो सोडला ! अशी कृती होण्यासाठी उच्चतम त्यागी वृत्ती अंगी असणे आवश्यक असते. ती दाभाडकर यांच्यात होती. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचे निधन झाले. सध्या समाज स्वार्थी आणि आत्मकेंद्रित होत असतांना दाभाडकर यांनी सर्वांसमोर ठेवलेल्या आदर्शाला तोड नाही. याच पार्श्वभूमीवर भाजपचे नेते अवधूत वाघ यांनी ट्वीटद्वारे ‘आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोलकरांचे नाहीत’, असे सांगत स्वतःची भूमिका मांडली. अर्थात् संघाच्या संस्कारांचे समर्थन करणारे आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विरोधातील हे ट्वीट असल्याने ते साहजिकच ‘वादग्रस्त’ या श्रेणीत गणले गेले. खरे पहाता यात वादग्रस्त असे काय आहे ? जी सत्य बाजू आहे, तीच अवधूत वाघ यांनी मांडण्याचा प्रयत्न केला; पण डॉ. दाभोलकर यांचे नाव आले असतांना इतके दिवस गपगुमान बिळात लपून बसलेल्या पुरो(अधो)गाम्यांचा कंपू जागा झाला नाही, तरच नवल ! सर्वांनी वाघ यांच्या विधानावर पुष्कळ टीका करत, बेंबीच्या देठापासूनच ओरडत आपापले बौद्धिक चातुर्य (कि दिवाळखोरी) दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. त्यांच्या टीकेचा विषय केवळ डॉ. दाभोलकर यांच्यापर्यंत मर्यादित राहिला नाही, तर फुले, शाहू आंबेडकर इथपर्यंत तो नेण्यात आला. ‘संघाचे संस्कार’, ‘दाभोलकरांचे मारेकरी’, ‘नथुराम गोडसेवादी मानसिकता’ अशा प्रकारे अनेक विषयांवर टीकाकारांनी टीका करण्यात धन्यता मानली. दाभाडकर यांचा त्याग राहिला दूरच, अवधूत वाघ यांनी त्यावरून व्यक्त केलेले प्रातिनिधीक स्वरूपातील मतही राहिले बाजूला; पुरोगाम्यांच्या टोळीने संघद्वेषाचा आणि हिंदुद्वेषाचा कंड शमवण्याचा यातून केविलवाणा प्रयत्न केला. एका वृद्ध व्यक्तीने केलेल्या त्यागाविषयी त्यांना वंदन करणे सोडाच कौतुकाचे चार शब्द बोलण्याचाही मोठेपणा पुरोगाम्यांमध्ये दिसून आला नाही. हा पुरो(अधो)गाम्यांचा वैचारिक कोतेपणा आहे.  वाघ यांच्या एका ट्वीटने पुरोगाम्यांचा (पोकळ) मानवतावाद उघडा पडला. वैचारिक प्रतिवाद आणि विवेकवाद यांच्या गप्पा मारणार्यांचे वैचारिक दारिद्य्र समोर आले. एका अर्थी  दाभाडकरांचे (हिंदुत्वनिष्ठांचे) संस्कार का हवेत आणि दाभोलकरांचे (पुरोगाम्यांचे) संस्कार का नकोत, हे पुरोगाम्यांच्या कृतीतून दिसून आले !

उच्चतम त्यागाची गाथा !

नारायण दाभाडकर

नारायण दाभाडकर यांचे उदाहरण पाहिले, तर ती एकप्रकारे त्यागकथाच आहे; पण तरीही तिला फोल ठरवत ‘भाकडकथा’ असे संबोधले गेले; कारण त्यांना असलेली संघाची पार्श्वभूमी ! समर्थ राष्ट्राचा विचार करत सतत सेवाकार्य आणि राष्ट्रकार्य करत रहाणे, भारतियत्वाचे मूल्य जोपासणे या शिकवणीच्या बळावरच आज संघाचे अनेक निष्ठावान स्वयंसेवक तत्त्वनिष्ठ राहून कार्यरत आहेत, समाजऋण फेडत आहेत. अशा प्रकारे संस्कारांची जपणूक करत नव्हे, तर ते आत्मसात् करत जीवन जगणार्यांची आज भारताला आवश्यकता आहे. परोपकार आणि त्याग या नैतिक मूल्यांच्या आधारावर स्वतःच्या उदाहरणातून समाजासमोर आदर्श ठेवणारे नारायण दाभाडकर यांच्यासारख्या व्यक्ती आज समाजात शोधून सापडणेही दुर्मिळ आहे आणि म्हणूनच दाभाडकर हे सर्वांसाठी आदर्शवत् ठरले आहेत. सध्याच्या आपत्कालीन स्थितीत खरेतर दाभाडकर यांच्या प्रसंगातून पुष्कळ शिकण्यासारखे आहे. अशा व्यक्तींचा सन्मान होणे, त्यांना आदर मिळवून देणे हे समाजाचे कर्तव्य आहे; पण दुर्दैवाची गोष्ट म्हणजे दाभाडकर यांच्या संदर्भात तसे झाले नाही. त्यांच्यावर विघ्नसंतोषी लोकांनी टीकाच केली. दाभाडकर यांच्याऐवजी ‘डिसोजा’ किंवा ‘दानिश’ असे आडनाव असले असते, तर या पुरोगाम्यांच्या टोळीने त्यांना डोक्यावरच घेतले असते. त्यांचे कौतुक सोहळे झाले असते. सामाजिक संकेतस्थळांवर त्यांचा उदोउदो झाला असता. वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रांसाठी संबंधितांना आमंत्रित करण्यात आले असते; पण दाभाडकर याला अपवाद ठरले; कारण ते संघाच्या मुशीत सिद्ध झालेले स्वयंसेवक होते. रुग्णालयानेही दाभाडकर यांच्या विरोधातच भूमिका घेऊन विरोधाच्या डबक्यात उडी घेतली. संघद्वेषी मनोवृत्ती बाळगणार्या एका मोठ्या वृत्तपत्राने दाभाडकर यांच्या घटनेच्या विरोधातच वृत्त दिले; पण जेव्हा त्यांच्या मुलीने पितृशोक बाजूला ठेवत या प्रसंगाविषयी सत्यकथन केले, तेव्हा सगळ्यांची तोंडे आपसूकच गप्प झाली. टीका, विरोध यांची उठलेली राळ शांत झाली. इटलीमध्ये १०३ वर्षे वय असणार्या एका वृद्धेने आपला बेड अन्य रुग्णाला दिला होता. तेव्हा ती वृद्ध महिला कौतुकास पात्र ठरली होती. मग जे इटलीमध्ये घडले, ते भारतात का घडू शकत नाही ? तसे न होणे हे देशाचे दुर्दैवच म्हणावे लागेल. ‘देहलीच्या एका मोठ्या रुग्णालयात मोठ्या नेत्यांसाठी बेड रिकामे ठेवले आहेत’, असे वृत्त होते. कुठे दाभाडकर आणि कुठे ही नेतेमंडळी ! दाभाडकर आणि वाघ यांच्यावर यथेच्छ तोंडसुख घेणारे देहलीच्या घटनेविषयी आता बोलण्याचे धारिष्ट्य तरी दाखवतील का ?

हिंदुत्वनिष्ठांचे दायित्व !

अवधूत वाघ

भारताला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे होऊनही हिंदुद्वेषी, राष्ट्रद्वेषी, पुरोगामी, निधर्मीवादी मनोवृत्तीच सर्वत्र पसरत आहे. याचा प्रत्यय विविध उदाहरणांतून येतो. या वृत्तीच्या निर्मूलनासाठी राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रेमच निर्माण व्हायला हवे. दाभाडकर प्रकरणावर अवधूत वाघ यांनी ट्वीट केले. वाघ वाघासारखे बोललेे आणि पुरोगाम्यांना पोटशूळ उठला ! पुरोगाम्यांनी टिवटिवाट करून कितीही थयथयाट केला, तरी हिंदुत्वनिष्ठ आणि सूज्ञ जनता त्यांना भीक घालणार नाहीत. दाभाडकर यांनी अंगीकारलेले उच्चतम संस्कार समाजात रुजवण्याचे कार्य हिंदुत्वनिष्ठ करत रहातील, हे या टोळीने लक्षात ठेवावे !