भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांची ‘ऑनलाईन’ बैठकीत घोषणा
परळी (जिल्हा बीड) – कोरोना महामारीचे दिवसेंदिवस वाढत जाणारे संकट लक्षात घेऊन भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी येथे कोरोनाबाधित रुग्णांसाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून ‘सेवा यज्ञ’ चालू करण्याची घोषणा केली आहे. या अंतर्गत लक्षणे नसलेल्या; मात्र कोरोना ‘पॉझेटिव्ह’ असलेल्या रुग्णांसाठी विलगीकरण केंद्र उभारण्याचे, तसेच बाधित महिला रुग्णांच्या घरी जेवणाचे डबे पोचवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
परळी मतदारसंघातील भाजपच्या मुख्य पदाधिकार्यांशी ‘ऑनलाईन’ बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी गंभीर परिस्थितीवर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या प्रारंभी भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.