कोरोना महामारीशी संबंधित गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडी

 

कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या साहाय्यासाठी अनेकांनी पुढे केले मदतीचे हात

कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे कुटुंबीय यांच्या साहाय्यासाठी अनेकांनी साहाय्याचे हात पुढे केले आहेत. यासाठी व्हॉट्सअ‍ॅप, ट्विटर आणि इंस्टाग्राम या सामाजिक माध्यमांचा परिणामकारक वापर केला जात आहे. कोरोनाबाधित रुग्णांना ‘ऑक्सिजन’ सिलिंडर पुरवणे, औषधालयांतून औषधे पुरवणे, प्लाझ्मा दानाची सोय करणे, घरी अलगीकरणात असलेल्यांसाठी जीवनावश्यक वस्तू पुरवणे, जवळच्या कोरोना चाचणी केंद्राविषयी माहिती देणे, रुग्णालयात खाटांच्या उपलब्धतेविषयी माहिती देणे आदी साहाय्य केले जात आहे. असे साहाय्य करणार्‍या एका गटाने ‘गोवा कोविड इन्क्वायरी’ हा व्हॉट्सअ‍ॅप गट सिद्ध केला आहे.

या गटाच्या संस्थापक सदस्य असलेल्या श्रुती चतुर्वेदी याविषयी अधिक माहिती देतांना म्हणाल्या, ‘‘कोरोनाबाधित रुग्णांना आम्ही एक ‘फॉर्मेट’ देतो यामध्ये त्यांना कोणती आवश्यकता आहे, याची माहिती भरावी लागते. याला मागील काही दिवसांत कोरोनाबाधित रुग्ण किंवा त्यांचे कुटुंबीय यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे. शासकीय यंत्रणा निकामी ठरल्याने ही व्यवस्था आम्हाला सिद्ध करावी लागत आहे. या सेवेसाठी आमच्या गटात २० कार्यकर्ते कार्यरत आहेत.’’

अशाच प्रकारे साहाय्य करणार्‍या निकिता केणी याविषयी अधिक माहिती देतांना म्हणाल्या, ‘‘मला स्वत:ला प्रतिदिन सुमारे १५० ते २०० जण संपर्क करतात, तसेच साहाय्य मागणारे मोठ्या प्रमाणावर व्हॉट्सअ‍ॅप संदेश प्रतिदिन येत असतात.’’

काणकोण येथे शेकडो विदेशी पर्यटक अजूनही अडकलेले : पर्यटकांची स्थिती दयनीय

वर्ष २०१९ मध्ये भारतात आलेले शेकडो विदेशी पर्यटक अजूनही काणकोण येथे अडकून पडले आहेत. वास्तविक केंद्र आणि राज्य शासन यांनी गतवर्षी दळणवळण बंदीच्या काळात राज्यात अडकून पडलेल्या विदेशी पर्यटकांना त्यांच्या देशात पोचवण्यासाठी विशेष विमानांची सोय केली होती; मात्र काणकोण येथे पर्यटक अडकून पडण्यासाठी अन्य विविध कारणे आहेत, असे पर्यटकांचे म्हणणे आहे. काही पर्यटक लहानशा देशातून आलेले आहेत, ज्या देशांनी कोरोना महामारीच्या काळात दळणवळण बंदी लागू झाल्यानंतर त्यांच्या देशवासियांना परत नेण्यासाठी विमाने पाठवलेली नाहीत. कोरोना महामारीमुळे पैशांची उणीव भासणे, गोव्यातील असह्य उकाडा, दळणवळण बंदी काळात निवास आणि जेवण यांची सोय न होणे, या पर्यटकांना सर्वच स्तरांवर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पुढे येणार्‍या गोव्यातील पावसाळ्याची या पर्यटकांना भीती वाटत आहे.

सुपरस्पेशालिटी रुग्णालय १५ मेपासून कोविड रुग्णालय म्हणून कार्यरत करणार

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय १५ मेपासून कोविड रुग्णालय म्हणून कार्यरत करण्यात येणार आहे. या ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णांसाठी ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा उपलब्ध असतील, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली.

शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी शाळांमध्ये न येण्याचा शिक्षण खात्याचा सुधारित आदेश

शिक्षण खात्याचे संचालक दिलीप भगत यांनी २६ एप्रिल या दिवशी सुधारित आदेश काढला असून यामध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना पुढील आदेश येईपर्यंत शाळांमध्ये उपस्थिती न लावण्याविषयी सांगण्यात आले आहे. वर्ग किंंवा अन्य कामे ‘ऑनलाईन’ पद्धतीने करण्यात यावी, असे आदेशात म्हटले आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर हा सुधारित आदेश काढण्यात आला आहे.