कोरोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर पूर्वसिद्धता करण्यासाठी शासनाला पुरेसा अवधी मिळूनही सिद्धता करण्यास शासन अल्प पडले. याचा परिणाम काही रुग्णांना जीव गमवावा लागला, तर काहींनी साठेबाजी, काळाबाजार करून पैसे कमवून रुग्णांना लुटले. असंवेदनशील प्रशासन जनतेच्या जिवाशी खेळत आहे, असा विचार कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
पुणे – जिल्ह्यातील ५४० खासगी रुग्णालयांना आतापर्यंत ३२ सहस्र ६१ रेमडेसिविर इंजेक्शनच्या व्हायल्सचे वितरण केले आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी शहरी भागात ६ भरारी पथके तर ग्रामीण भागात १२ भरारी पथके तहसीलदारांच्या नियंत्रणाखाली स्थापन केली आहेत. त्यांच्या वतीने रुग्णालये, साठा करणारे आणि वितरण करणारे यांच्याकडील इंजेक्शनची उपलब्धता अन् सुयोग्य वापर यावर नियंत्रण ठेवण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी दिली.
एकूण इंजेक्शनपैकी ८ सहस्र १०० रेमडेसिविर इंजेक्शन पुणे, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, कॅन्टोन्मेंट क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्रातील रुग्णालयांना वितरित केले आहेत. जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा लक्षात घेऊन ११ एप्रिल पासून रेमडेसिविर नियंत्रण कक्ष कार्यान्वित केला आहे.