राज्यात अनेक डॉक्टर कोरोनाबाधित, कोरोनाची दुसरी लाट खूप प्रबळ ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

कोरोनाबाधित रुग्णांना भूमीवर आणि स्ट्रेचरवर झोपावे लागते.

विश्‍वजीत राणे

पणजी, १९ एप्रिल (वार्ता.) – राज्यात आलेली कोरोनाची दुसरी लाट खूप प्रबळ आहे. राज्यातील अनेक डॉक्टर कोरोनाबाधित झाले आहेत. राज्याला प्रत्येक आठवड्याला १ सहस्र २०० रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता भासत आहे. आरोग्यविषयक तज्ञांची २० एप्रिल या दिवशी एक महत्त्वाची बैठक होणार आहे आणि यामध्ये महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना भूमीवर आणि स्ट्रेचरवर झोपावे लागत आहे. खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी खाटांची क्षमता वाढणे अत्यावश्यक झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

खासगी रुग्णालयांनी ४० टक्के खाटा कोरोना व्यवस्थापनासाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक

खासगी रुग्णालयांनी त्यांच्या ४० टक्के खाटा कोरोना व्यवस्थापनासाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. खासगी रुग्णालये त्यांच्या दायित्वापासून दूर जाऊ शकत नाहीत. राज्यात यापुढे ‘ऑक्सीजन’ची मागणी दुपटीने वाढणार आहे. राज्यात ‘ऑक्सीजन’ची सुविधा असलेल्या अधिक खाटांची आवश्यकता आहे, असे आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे पुढे म्हणाले.