दायित्वशून्यतेने वागणार्‍यांमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत आहे ! – राजू मसुरकर, अध्यक्ष, जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान

राजू मसुरकर

सावंतवाडी – सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना महामारीची साथ आटोक्यात आणण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा वगळून दळणवळण बंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याला कोरोनाचे नियम न पाळणार्‍या व्यक्ती उत्तरदायी असून त्यांच्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. यात सर्वसामान्य व्यक्ती, व्यापारी, नोकरी करणारे, हातावर पोट असणारे भरडले जात आहेत. कोरोनाचे नियम न पाळणार्‍यांना शिक्षा केली जावी, अशी संतप्त प्रतिक्रिया जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस सरचटणीस राजू मसुरकर यांनी व्यक्त केली आहे.

आज कोरोनामुळे देशात मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाणही पुष्कळ आहे. तोंडावर मास्क न लावणारे, गर्दीच्या किंवा अन्यत्र सामाजिक अतंर न पाळणारे पाकिस्तान आणि चीन धार्जिण्या मनोवृत्तीचे काही लोक हिंदुस्थानात वागत असल्याने कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. मास्क न लावता व्यक्ती आढळल्यास ५ सहस्र रुपये दंड किंवा १५ दिवसांचा कारावास, महिला किंवा ज्येष्ठ नागरिक, तसेच १४ वर्षांखालील मुले सापडल्यास त्यांना शाळेमध्ये कैद किंवा सार्वजनिक हॉलमध्ये साधी कैद करण्यात यावी, असे मसुरकर यांनी म्हटले आहे.