राजकारणी कोरोनाशी संबंधित मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता चुकीचा आदर्श जनतेसमोर ठेवत आहेत !  आरोग्य कर्मचारी

पणजी, १५ एप्रिल (वार्ता.)-  गोवा राज्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर अधिकाधिक लोकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असले, तरी राजकारणी कोरोनाविषयीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करता जनतसमोर चुकीचा आदर्श ठेवत आहेत, असे आरोग्य कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या प्रतिनिधीकडे बोलतांना त्यांनी हा आरोप केला आहे.

आरोग्य कर्मचार्‍यांचे म्हणणे पुढीलप्रमाणे आहे.

१. एकत्र जमू नये असे शासन सांगते; परंतु हे राजकारणी स्वतःच शासकीय कार्यक्रम ठेवतात. अशा प्रकारचे शासकीय कार्यक्रम, उद्घाटन समारंभ हे टाळले पाहिजेत. ते जनतेसमोर आदर्श उदाहरण ठेवत नाहीत. मास्क न वापरता ते समाजात जाऊन भाषणे देतात, तसेच उद्घाटन समारंभाला जातात.

२. शासन आर्थिक व्यवहार बंद ठेवू शकत नाही, हे आम्हाला ठाऊक आहे; परंतु अशा प्रकारे अनावश्यक लोकांनी एकत्र येणे बंद झाले पाहिजे. मास्क न वापरता आणि सामाजिक अंतर न पाळता हे नेते जनतेसमोर चुकीचा आदर्श ठेवत आहेत.

३. मागे झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये अनेक जण कोरोनाविषयक नियमांचे पालन करतांना दिसत नव्हते. पणजी नगरपालिका निवडणुकीत विजयी झाल्यानंतर बाबुश मोन्सेरात यांच्या गटाने पणजीत रस्त्यावरून मिरवणूक काढली होती. त्यानंतर बाबुश मोन्सेरात कोरोनाबाधित आढळले होते. निवडणुकीतील विजयानंतर मास्क न घातलेल्या आपल्या समर्थकांना बाबुश मोन्सेरात भेटत होते. या वेळी सामाजिक अंतरही पाळले जात नव्हते. त्यानंतर बाबुश मोन्सेरात त्यांच्या समर्थकांसह एका उपाहारगृहात विजय साजरा करत आहेत, असे चित्रीकरणही सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले होते. अशी लज्जास्पद कृती करणार्‍या राजकारण्यांना सर्वसाधारण नागरिकांप्रमाणेच दंड दिला पाहिजे.

४. गेल्या महिन्यात झालेल्या जिल्हा पंचायत फेरनिवडणुकीच्या वेळी प्रतिमा कुतिन्हो या उमदेवार मतदान केंद्रावर मास्क न घातला गेल्या होत्या. या वेळी थर्मल गनने त्यांची तपासणी करण्यात आली; परंतु त्यानंतर त्यांनी मास्क न घालताच मतदान केले. याविषयी त्यांना विचारताच त्यांनी ‘मी अ‍ॅन्टीबॉडीज विकसित केल्या आहेत’, असे उत्तर दिले. (स्वतः अ‍ॅन्टीबॉडीज विकसित केल्या तर तुमचे रक्षण होईल; पण तुम्ही कोरोनाबाधित असाल, तर तुम्ही मास्क न घातल्याने इतरांना संसर्ग होऊ शकतो, त्याचे काय ? का एवढेही समजत नाही ? असे राजकारणी जनहित काय साधणार ? – संपादक)