शिखर शिंगणापूर येथील प्रांताधिकारी यांच्या बैठकीत निर्णय
सातारा, ८ एप्रिल (वार्ता.) – महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यातील भाविकांचे आराध्य दैवत असणार्या श्री शंभू महादेवाची चैत्री यात्रा सलग दुसर्या वर्षी रहित करण्यात आली आहे. हा निर्णय प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी ग्रामपंचायत कार्यालय सभागृहात घेतलेल्या बैठकीत घेतला.
या वेळी माणच्या तहसीलदार बाई माने, साहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार भुजबळ, आरोग्य अधिकारी आधुनिक वैद्य स्वाती बंदुके, देवस्थान व्यवस्थापक आेंकार देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वर्षी ही यात्रा १७ ते २७ एप्रिल या कालावधीत होणार होती; परंतु वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने कठोर निर्बंध लागू केले आहेत. यात्रेसाठी अनुमाने ७ ते ८ लाख भाविक शिखर शिंगणापूर येथे येतात. ही गर्दी टाळून संसर्ग रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. यात्रेतील सर्व धार्मिक विधी स्थानिक सेवाधारी, मानकरी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडणार आहेत, असेही प्रांताधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.