जर आम्ही हिंदूंना आवाहन केले असते, तर निवडणूक आयोगाने नोटीस बजावली असती !

पंतप्रधान मोदी यांची मुसलमानांकडे मतांचे आवाहन करणार्‍या ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

कोलकाता (बंगाल) – ममता बॅनर्जी यांच्यावर मुसलमानांकडे उघडपणे मत देण्याची मागणी करण्याची वेळ आली आहे. यातून लक्षात येते की, मुसलमानांची मते त्यांच्या हातातून निसटू लागली आहेत; मात्र ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगाची या मागणीमुळे नोटीस येणार नाही. जर आम्ही, ‘सर्व हिंदूंनो संघटित व्हा आणि भाजपला मत द्या’, असे म्हटले असते, तर निवडणूक आयोगाची आम्हाला नोटीस आली असती, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुचबिहार येथे आयोजित सभेत केली. बंगालच्या निवडणुकीच्या प्रसारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते.

मोदी पुढे म्हणाले की, ममता बॅनर्जी इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राला शिव्या देत आहेत; मात्र त्या याच यंत्राद्वारे झालेल्या मतदानामुळे पूर्वी जिंकल्या होत्या. यातून हे स्पष्ट होते की, त्या निवडणूक हरणार आहेत. त्या म्हणतात, ‘लोक पैसे घेऊन भाजपच्या सभेला येत आहेत.’ असे आरोप करून ममता बॅनर्जी बंगालच्या लोकांचा अपमान करत आहेत.