गोव्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची चिन्हे

  • रुग्णसंख्येत प्रतिदिन वाढ

  • खाटांची कमतरता

पणजी, ५ एप्रिल (वार्ता.) – गोवा राज्यात कोरोनाची दुसरी लाट येत असल्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत. राज्यात गेल्या काही दिवसांत प्रतिदिन सुमारे २५० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळत  आहेत.

नोव्हेंबर २०२० पासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या घटू लागली होती; मात्र मार्च मासाच्या अखेरपासून कोरोनाबाधित नवीन रुग्ण सापडण्याच्या संख्येत प्रतिदिन वाढ होत आहे. ही वाढ एप्रिल मासातही दिवसागणिक वाढतांना दिसत आहे. गेल्या १० दिवसांत प्रतिदिन कोरोनाबाधित २०० ते २८० नवीन रुग्ण सापडत आहेत, तर प्रतिदिन चाचणीच्या तुलनेत कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची टक्केवारी १४ वर पोचली आहे. क्लब, पब, तसेच राज्यात येणारे पर्यटक कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठीच्या निर्बंधांचे सर्रासपणे उल्लंघन करत असल्याचे दिसत आहे, तसेच राज्यात कोरोनाच्या लसीकरणालाही अपेक्षित असा प्रतिसाद लाभत नसल्याचे दिसत आहे.

गोमेकॉत खाटांची कमतरता 

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत असलेल्या गोवा वैद्यकीय महविद्यालयासह अन्य रुग्णालयांमध्येही खाटा झपाट्याने भरत आहेत. या ठिकाणी खाटांच्या अभावी कोरोनाबाधित १० रुग्णांना ‘ट्रॉली’वर झोपवून उपचार द्यावे लागत आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पुढील एका आठवड्याच्या आत ३०० अतिरिक्त खाटा उपलब्ध करण्यात येणार आहेत. मडगाव येथील इ.एस्.आय. रुग्णालयाचे २ मजले कोरोना निगा केंद्रे करण्यात आली आहेत, तर बांबोळी येथील श्यामा प्रसाद मुखर्जी मैदानात कोरोना निगा केंद्र उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे.

  • दिवसभरात कोरोनाबाधित २४७ नवीन रुग्ण

  • एकूण रुग्णसंख्येपैकी बार्देश तालुक्यात सर्वाधिक ६२३ रुग्ण

पणजी, ५ एप्रिल (वार्ता.) – राज्यात ५ एप्रिल या दिवशी कोरोनाविषयक २ सहस्र २६ चाचण्या करण्यात आल्या. यांपैकी २४७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याची टक्केवारी १२ टक्के आहे. दिवसभरात १४२ रुग्ण बरे झाले. यामुळे राज्यात प्रत्यक्ष उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या २ सहस्र १८० झाली आहे. ५ एप्रिलला २ कोरोनाबाधित रुग्णांचे निधन झाले. कोरोनाचा संसर्ग झाल्याने निधन पावलेल्यांची राज्यातील एकूण संख्या आता ८३७ झाली आहे. तालुक्यांनुसार विभागणी केल्यास एकूण रुग्णांपैकी बार्देश तालुक्यात सर्वाधिक ६२३, सासष्टी ४७४, तिसवाडी ३०८, मुरगाव २४६ आणि फोंडा २०८ रुग्ण आहेत.

संसर्ग टाळण्यासाठी कठोर निर्बंध लादण्याची आवश्यकता नाही ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

 डॉ. प्रमोद सावंत

पणजी – राज्यात कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आणखी कठोर निर्बंध लादण्याची आवश्यकता नाही, तसेच परराज्यांतून येणार्‍या प्रवाशांना कोरोनाचा संसर्ग झाला नसल्याचा चाचणी दाखला आणणे बंधनकारक करणे आताच्या घडीला आवश्यक नाही, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

ते पुढे म्हणाले, ‘‘सध्या गोवा शासन परिस्थितीचे सातत्याने निरीक्षण करत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे; मात्र गोव्याशेजारील सिंधुदुर्ग जिल्हात अशी स्थिती नाही. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या शासनांच्या निर्णयांवर गोवा शासन लक्ष ठेवून आहे. गोव्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे, ही एक चिंतेची गोष्ट आहे. संसर्ग रोखण्याचे दायित्व नागरिक आणि शासन या दोघांचेही आहे. शासनाच्या वतीने कोरोनाा चाचण्यांमध्ये वाढ करण्यात येईल, तर नागरिकांनी संसर्ग टाळण्यासाठीच्या निर्बंधांचे कठोरतेने पालन करणे आवश्यक आहे.’’

काही प्रमाणात निर्बंध लादणे काळाची आवश्यकता ! – विश्‍वजीत राणे, आरोग्यमंत्री

विश्‍वजीत राणे

पणजी – राज्यात ‘दळणवळण बंदी’ लागू करण्याची आवश्यकता नाही; मात्र शासनाने त्वरित गोवा सुरक्षित ठेवण्यासाठी काही प्रमाणात निर्बंध लादणे काळाची आवश्यकता आहे, असे मत आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी व्यक्त केले आहे.

ते पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील आपत्कालीन व्यवस्थापन समितीने कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास करून काही निर्बंध लादण्याची शिफारस केली आहे. निर्बंध लादण्याची हीच वेळ आहे. याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासमवेत बैठक घेतली जाणार आहे.’’