पणजी – कोरोनाची लस घेतल्यानंतर ४८ घंट्यांच्या आत केपे येथील एका ३२ वर्षीय व्यक्तीचे निधन झालेे. ही व्यक्ती अन्य व्याधींनीही ग्रस्त होती, अशी माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी दिली आहे.
ते पुढे म्हणाले, ‘‘संबंधित व्यक्तीने २४ मार्च या दिवशी कोरोना लसीचा डोस घेतला होता. लस घेतल्यानंतर तिच्यामध्ये काही लक्षणे दिसू लागल्याने तिला हॉस्पिसियो रुग्णालयात भरती करण्यात आले. त्या ठिकाणी हृदयविकाराचा झटका आल्याने त्या व्यक्तीचे निधन झाले. या व्यक्तीला मधुमेह आणि मूत्रपिंडाचा त्रास होता. तिची दोन्हीही मूत्रपिंडे चालत नव्हती. लस घेऊन २४ घंट्यांच्या आत निधन झाल्याने शवचिकित्सेचे चित्रीकरण करण्यात आले आहे. ‘कोविशिल्ड’ लस घेतल्याने व्यक्तीचे निधन झालेले नाही. व्यक्तीचे निधन कोणत्या कारणामुळे झाले, याविषयी चाचण्या करण्यात येत आहेत. या चाचण्यांचा अंतिम अहवाल सार्वजनिक करण्यात येणार आहे.’’
१ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांंसाठी लसीकरण
राज्यात एकूण ९७ सहस्र लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस, तर १७ सहस्र लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. राज्यात १ एप्रिलपासून ४५ वर्षांहून अधिक वय असलेल्यांंसाठी लसीकरण मोहिमेला प्रारंभ होत आहे. आरोग्य खाते औद्योगिक वसाहतींमध्येही कर्मचार्यांच्या सोयीसाठी लसीकरण केंद्रे चालू करणार आहे.