गुजरात बॉम्बस्फोटामधील आरोपीला पुणे येथून १५ वर्षांनंतर अटक !

मोहसीन पूनावाला याला अटक

पुणे – अहमदाबाद जिल्ह्यातील कालुपूर रेल्वे स्थानक येथे वर्ष २००६ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी पुणे पोलिसांच्या साहाय्याने गुजरात आतंकवादविरोधी पथकाने (ए.टी.एस्.) मोहसीन पूनावाला याला वानवडी परिसरातून २३ मार्च या दिवशी अटक केली.

अनुमाने १५ वर्षांनंतर मोहसीनला अटक करण्यात ‘ए.टी.एस्.’ला यश आले आहे. गुजरात ए.टी.एस्.चे पथक मोहसीनला घेऊन गुजरातला रवाना झाले आहे. या प्रकरणातील १२ आरोपींना आजवर अटक झाली असून मोहसीन पूनावाला हा तेरावा आरोपी आहे, तर यातील १० आरोपींचा अजून शोध चालूच आहे. हे सर्व आरोपी लष्कर-ए-तोयबा या आतंकवादी संघटनेशी संबंधित आहेत.

गुजरात ए.टी.एस्. १४ वर्षांपासून पसार असलेल्या अब्दुल रजाक गाजीला ऑगस्ट २०२० मध्ये बांगलादेशाच्या सीमेवरून अटक केली होती. त्या वेळी मोहसीनची माहिती समोर आली होती. तेव्हापासून गुजरात ए.टी.एस्.चे पथक मोहसीनच्या मागावर होते. फेब्रुवारी २००६ मध्ये कालुपूर रेल्वे स्टेशनच्या ‘प्लॅटफॉर्म’ क्रमांक २ आणि ३ च्या मध्यभागी बाँब ठेवल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या स्फोटात अनेक लोक घायाळ झाले होते.