मुंबई – विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी २३ मार्च या दिवशी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन सरकारविषयी मनातील असंतोष व्यक्त केला. या वेळी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, तसेच राज्याची कोरोनाविषयक स्थिती यांविषयी त्यांनी राज्यपालांशी चर्चा केली.
या भेटीनंतर पत्रकारांनी बोलतांना प्रवीण दरेकर म्हणाले, ‘‘राज्यात मोठ्या प्रमाणावर वाढलेला भ्रष्टाचार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप पहाता महाविकास आघाडी सरकारला नैतिकता राहिलेली नाही. या सरकारला केवळ सत्ता टिकवायची आहे. या सर्व गोष्टी मी राज्यपालांच्या कानावर घातल्या आहेत. अनेक राज्यात कोरोना संपुष्टात आला असतांना अर्थव्यवस्थेला पुन्हा चालना मिळाली आहे. महाराष्ट्रात मात्र राज्य सरकार कोरोनाच्या संकटाशी दोन हात करण्यासाठी चाचपडत आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असे सरकार बघितलेले नाही.’’