कुंभसारख्या मोठ्या सोहळ्याची उत्तराखंड प्रशासनाने कशा प्रकारे सिद्धता केली आहे, हेच यातून दिसून येते. आता सरकारने यात हस्तक्षेप करून प्रशासनातील संबंधितांवर कारवाई करणे आवश्यक !
हरिद्वार, १९ मार्च (वार्ता.) – ‘हरकी पौडी’पासून काही अंतरावर असलेल्या हरिपूर कला ग्रामपंचायतीतील रस्त्यांसह सप्त सरोवर मार्गाचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. कुंभमेळा काही दिवसांवर येऊन ठेपला असतांनाही अद्याप कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. (यावरून उत्तराखंड राज्याच्या प्रशासनाची (अ)कार्यक्षमता दिसून येते. एखाद्या अन्य पंथियांचा जर मोठा उत्सव असता, तर प्रशासनाने अशा प्रकारे रस्त्याची दुरवस्था ठेवली असती का ? – संपादक) त्यामुळे कुंभमेळ्याला आलेल्या भाविकांमध्ये प्रशासनाविषयी संतापाची भावना निर्माण झाली आहे.
१. हरिपूर कला ग्रामपंचायत, हरिद्वार नगरपालिका आणि मेळा अधिकारी यांच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे चालू आहेत. याकडे सर्व प्राधिकरणांचे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. परिणामी या ठिकाणी मुख्य, तसेेच अंतर्गत रस्त्यांवर बांधकाम साहित्य अस्ताव्यस्त पडले आहे.
२. विशेष म्हणजे सप्त सरोवर मार्ग, हरिपूर कला या ठिकाणी सर्वाधिक आश्रम आहेेत. येथील रस्त्यांना अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. यामुळे येुथे धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बांधकामासाठीची रेती-खडीही रस्त्यांवर पसरली आहे. यामध्ये या मार्गावरून गाड्यांची ये-जा होताच धूळ उडत असल्याने येथील रहिवाशांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत. या ठिकाणांच्या आश्रमामध्ये देश-विदेशातील भक्तगण येत असल्याने प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेची लक्तरे वेशीवर टांगली जात आहेत.
३. एखाद्या भागातून मुख्यमंत्री जाणार असतील किंवा एखाद्या ठिकाणी ते उद्घाटनाला येणार असतील, तर त्या भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांना तात्पुरती मलमपट्टी केली जाते.
४. मंत्री कार्यक्रमाला असेपर्यंतच रस्त्यांवरील कचरा काढला जातो. एकदा का कार्यक्रम संपला की, दुसर्या क्षणापासून पुन्हा रस्त्यांवर कचर्याचे ढिग दिसू लागतात. देशात सर्वत्रच असे चित्र असल्याने हरिद्वारही त्याला अपवाद राहिलेले नाही, याचा अनुभव नेत्रकुंभच्या उद्घाटनाच्या वेळी भाविकांना आला.
५. हरकी पौडी, कनखल, भीमगोडा आदी भागांत रस्ते सुस्थितीत आहेत; मात्र त्या रस्त्यांवरही सर्वत्र असलेली दुतर्फा वाहनांचे ‘पार्किंग’ ही भाविकांची डोकेदुखी ठरली आहे. अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढती संख्या यांमुळे वाहतुकीची कोंडी हा या ठिकाणी नित्याचाच विषय झाला आहे. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढून जाण्यासाठी प्रत्येकाला घाई असल्याने परिणामी सतत हॉर्न वाजवले जातात. यामुळे वायूप्रदूषणासह ध्वनीप्रदूषणही येथील परिसरात अधिक आहे.