मुंबई आतंकवादविरोधी पथकाकडून मनसुख हिरेन यांच्या हत्येचा गुन्हा नोंद

घराखाली कडक बंदोबस्त !

ठाणे, ९ मार्च (वार्ता.) – येथील व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूचे गूढ कायम असतांनाच राज्याच्या गृह विभागाच्या आदेशानुसार ठाणे शहर पोलिसांनाकडून मनसुख हिरेन यांच्या अकस्मात् मृत्यू प्रकरणाचे अन्वेषण मुंबई आतंकवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आले. मुंबई आतंकवादविरोधी पथकाचे उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या पथकाने साडेतीन घंटे हिरेन यांची पत्नी, मुले आणि नातेवाईक यांच्यासमवेत चर्चा केली. हिरेन यांच्या पत्नी विमला यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबई आतंकवादविरोधी पथकाने ७ मार्च या दिवशी गुन्हा नोंद केला आहे.

हिरेन यांच्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारची माहिती पोलिसांच्या व्यतिरिक्त कुणालाही देऊ नये, असे सांगण्यात आल्याचे समजते. त्यांचे कुटुंबीय तसेच मित्रपरिवार यांनी एका शोकसभेचे आयोजन केले आहे. त्यानंतर कुटुंबीय पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. त्यांच्या ठाणे येथील घराखाली पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.