हरिद्वार येथे साधू-संतांसह भाविकांनी केले माघी पौर्णिमेचे पवित्र स्नान !

‘हर की पौडी’ येथे स्नान करतांना भाविक

हरिद्वार (उत्तराखंड) – माघ पौर्णिमेच्या निमित्ताने ‘हर की पौडी’ येथील ब्रह्मा कुंड आणि गंगेचा तट यांठिकाणी पहाटेपासून भाविकांनी पर्व स्नान केले. हरिद्वार कुंभमेळ्यासाठी येथे पोचलेले संत आणि महंत यांनीही या स्नानाचा आनंद घेतला. हे हरिद्वार महाकुंभातील चौथे पर्व स्नान आहे. ‘पौष पौर्णिमेप्रमाणेच माघी पौर्णिमेला गंगानदीमध्ये स्नान केल्याने सर्व पापे धुतली जातात’, अशी मान्यता आहे. ‘या दिवशी पवित्र गंगानदीमध्ये स्नान केल्याने त्वचा नेहमी निरोगी रहाते’, तसेच ‘माघी पौर्णिमेच्या दिवशी भगवान श्रीविष्णु स्वतः गंगाजलामध्ये निवास करतात’, अशी मान्यता आहे. या दिवशी स्नान करणे आणि त्यानंतर दान करणे अत्यंत शुभ समजले जाते.

पंचायती आखाडा श्री निरंजनीमध्ये धर्मध्वजाची स्थापना !

धर्मध्वजाचे पूजन करतांना साधू, संत आणि महंत

येथील पंचायती आखाडा श्री निरंजनीमध्ये सकाळी धर्मध्वजाची स्थापना करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या वेळी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्री महंत नरेंद्र गिरि, निरंजन पीठाधिश्‍वर आचार्य महामंडलेश्‍वर स्वामी कैलाशानंद गिरि, महंत दामोदरदास, महंत ललितानंद आदि संतांची वंदनीय उपस्थिती होती.

१. ‘हर हर महादेव’चा जयघोष करत आखाड्याचे साधू आणि संत यांनी धर्मध्वजाला स्थापनेच्या ठिकाणी नेले. श्री महंत नरेंद्र गिरि यांच्यासह अन्य संत आणि महंत यांनी धर्मध्वजाचा शास्त्रानुसार मोरपंख, रूद्राक्षाच्या माळा, टिळा, चंदन आदीद्वारे पूजन केले. ‘हर हर महादेव’च्या जयघोषात ५२ फुटांचा हा धर्मध्वज स्थापन करण्यात आला. ड्रोनच्या साहाय्याने याच्या सुरक्षेवर लक्ष ठेवले जात आहे.

२. कार्यक्रमामध्ये कुंभमेळा अधिकारी दीपक रावत, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस, हिंदु जनजागृती समितीचे उत्तराखंड समन्वयक श्री. श्रीराम लुकतुके, समितीचे पंजाब आणि हरियाणा समन्वयक श्री. कार्तिक साळुंके हे उपस्थित होते. त्यांनी संतांचे आशीर्वाद घेतले.