संतांना विश्‍वासात घेतल्याविना कुंभमेळ्याचा कालावधी निश्‍चित होऊ शकत नाही !


हरिद्वार (उत्तराखंड) – संतांना विश्‍वासात घेतल्याविना येथील कुंभमेळ्याचा कालावधी निश्‍चित केला जाऊ शकत नाही. २४ किंवा २५ फेब्रुवारीला अखिल भारतीय आखाडा परिषदेची सामूहिक बैठक होणार आहे. त्यात कालावधीचा निर्णय घेतला जाईल. जर सरकार संतांसमवेत नसेल, तर संतही सरकारसमवेत नसतील, अशी चेतावणी परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांनी दिली आहे. राज्याचे मुख्य सचिव ओम प्रकाश यांनी ‘१ एप्रिलपासून कुंभमेळ्या प्रारंभ होईल’, असे म्हटले होते. त्यावरून महंत नरेंद्र गिरि यांनी संताप व्यक्त करत वरील विधान केले.

महंत नरेंद्र गिरि पुढे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडून पूर्वीच ४ राजयोगी स्नान असण्याची घोषणा करण्यात आली आहे. असे असतांना १ एप्रिलपासून कुंभला प्रारंभ झाला, तर ११ मार्चचे राजयोगी स्नान कसे होईल ?, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

संतांमध्येच मतभेद !

१. याविषयी बाबा हठयोगी म्हणाले की, कोरोनाचे संकट पहाता १ एप्रिलचा निर्णय योग्य वाटतो. २५ मार्चपासून संन्यासी साधूंच्या आगमनास प्रारंभ होईल. यापूर्वी सरकारने संतांसाठीची व्यवस्था पहावी.

२. आखाडा परिषदेचे महामंत्री महंत हरि गिरि म्हणाले की, सरकारचा प्रत्येक निर्णय आम्हाला मान्य असेल; कारण आम्ही वचन दिले आहे. कोरोनाच्या काळामध्ये स्वतःसमवेत अन्य लोकांच्या सुरक्षेलाही प्राधान्य असेल. कुंभचा कालावधी अल्प किंवा अधिक करण्याचा निर्णय सरकारचा आहे. आम्ही त्याचे स्वागत करू.