देहलीऐवजी चीनच्या सीमेवर खिळे ठोकले असते, तर चीनने घुसखोरी केली नसती ! – संजय राऊत यांची केंद्र सरकारवर टीका

शिवसेनेच्या शिष्टमंडळाकडून देहलीच्या सीमेवर शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट

राकेश टिकैत आणि संजय राऊत यांची भेट

नवी देहली – शेतकर्‍यांना अडवण्यासाठी रस्त्यावर खिळे ठोकले जात आहेत. तसेच खिळे सीमेवर ठोकले असते, तर चीनने घुसखोरी केली नसती, अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेच्या खासदारांच्या एका शिष्टमंडळाने देहलीच्या गाझीपूर सीमेवरील शेतकर्‍यांच्या आंदोलनस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली. शेतकरी नेते राकेश टिकैत यांची खासदार संजय राऊत, अरविंद सावंत, विनायक राऊत आदी शिवसेना खासदारांनी भेट घेतली. शिवसेना नेत्यांच्या भेटीनंतर राकेश टिकैत यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, विरोधक आम्हाला पाठिंबा देण्यास येत असल्यास आम्हाला कोणतीही अडचण नाही; पण त्याचे राजकारण होऊ नये.

(सौजन्य : India Today)

तत्पूर्वी संजय राऊत म्हणाले की, आम्ही शेतकर्‍यांची भेट घेणार आहोत. महाविकास आघाडीचे सरकार तुमच्या पाठीशी असल्याचा विश्‍वास आम्ही शेतकरी नेते राकेश टिकैत यांना देऊ. शेतकरी केवळ स्वत:साठीच नाही, तर आपल्यासाठीही आंदोलन करत आहेत. त्यांच्या लढ्याला बळ देणे हे आम्ही आमचे कर्तव्य समजतो. हाच तिरंग्याचा सन्मान आहे.