रामचरितमानस आणि शिक्षा !

छत्तीसगड येथील भिलाईच्या जलदगती न्यायालयाच्या न्यायाधीश ममता भोजवानी यांनी एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाच्या खटल्यात निकाल देतांना संत तुलसीदास रचित ‘रामचरितमानस’मधील एका श्‍लोकाचा (चौपाई) उल्लेख करत आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप आणि आर्थिक दंड ठोठावला. या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करणारी व्यक्ती तिचा मामाच आहे. रामचरितमानसमधील किष्किंधा कांडामध्ये वाली वधाच्या वेळच्या श्‍लोकाचा अर्थ सांगतांना न्यायाधीश म्हणाल्या की, लहान भावाची पत्नी, बहीण, सून आणि मुलगी हे सर्व समान आहेत, त्यांच्याकडे वाईट नजरेने पहाणार्‍याचा संहार करणे पाप नाही. न्यायाधिशांनी निकाल देतांना हिंदूंच्या ग्रंथातील एका श्‍लोकाचा उल्लेख करणे वैशिष्ट्यपूर्ण आहे.

हिंदु संस्कृतीला कोट्यवधी वर्षांचा इतिहास आहे. हिंदु संस्कृतीचे मूलाधार अनेक ग्रंथ आणि ऋषी हे आहेत. मनुष्याने कसे वागावे आणि कसे वागू नये, याचे तपशीलवार वर्णन या ग्रंथांमध्ये आहे. कोणत्या चुका केल्यावर काय शिक्षा घ्यावी अथवा पापक्षालनासाठी कोणते प्रायश्‍चित्त घ्यावे, याची माहिती ग्रंथांमध्ये आहे. त्याआधारेच हिंदु सभ्यता टिकून राहिली आहे. सध्याच्या कायदेप्रणालीने हिंदु धर्मग्रंथांचा उल्लेख निकाल देतांना करणे, ही धर्मग्रंथांची परिपूर्णता आणि कालातीतता स्पष्ट करते. या धर्मग्रंथांतील शिकवणुकीनुसार मानवजातीने आचरण केल्यास निश्‍चितपणे समष्टी हित जपले जाईलच, गुन्हेगारीही अल्प होईल, हे येथे लक्षात घ्यावे.