मुसलमान प्रशासकांच्या काळातील भोपाळमधील सर्व अपवित्र नावे आम्ही पालटणार ! – भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह

केवळ भोपळ नव्हे, तर संपूर्ण भारतातील अशी नावे केंद्रातील भाजप सरकारने पालटावी, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !

खासदार साध्वी प्रज्ञा सिंह

भोपाळ (मध्यप्रदेश) – कोणत्याही जागेला एखाद्या व्यक्तीचे नाव दिल्यास त्याचा प्रभाव त्या जागेवर आणि लोकांवर पडतो, असे म्हटले जाते. भोपाळच्या ‘लालघाटी’ येथे राणीच्या मुलांची हत्या करण्यात आली होती. हत्येनंतर हा घाट लाल झाला होता. त्यामुळेच त्याचे नाव ‘लालघाटी’ असे ठेवण्यात आले होते. ‘रक्ताने माखलेला घाट’ अशा अर्थाने या जागेचे नामकरण करण्यात आले आहे. याचप्रमाणे ‘हलाली डॅम’ परिसरामध्ये महंमद खान याने येथील राजांना ‘हलाल’ करून ठार केले होते. त्यामुळेच या जागेला ‘हलाली’ नाव पडले. ही नावे आणि त्यांच्या मागील इतिहास खूपच अपवित्र आहे. अशी नाव घेतल्याने अपवित्रता पसरते आणि नकारात्मक प्रचार होतो. अशी मुसलमान प्रशासकांच्या काळात रक्तरंजित इतिहास असणार्‍या सर्व ठिकाणांची नावे आम्ही भोपाळमधून पुसून टाकणार आहोत, असे येथील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी येथील एका कार्यक्रमात भाषण करतांना म्हटले. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी ‘हलालपुरा बस स्टॅण्ड’ आणि ‘इस्लामनगर’ ही नावे पालटण्यात यावीत आणि या ठिकाणांना क्रांतीकारकांची नावे देण्यात यावीत’, अशी मागणीही केली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून त्यात पालट का करत नाही ? – संपादक)

मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी ‘हलाली डॅम’चे नाव पालटण्याची मागणी काही दिवसांपूर्वीच केली होती. यासाठी त्यांनी बैरसियाचे भाजप आमदार विष्णु खत्री यांना एक पत्रही लिहिले होते. खत्री यांनी ‘यासाठी राज्याच्या पर्यटन आणि संस्कृती मंत्री असणार्‍या उषा ठाकुर यांच्याशी चर्चा करावी’, असे उमा भारती यांनी पत्रात म्हटले आहे. ‘ही जागा आणि तिचे नाव विश्‍वासघाताची आठवण करून देणारे आहे. त्यामुळेच हे नाव पालटण्यात यावे’, असे उमा भारती यांनी म्हटले होते.