बांगलादेशातील हिंदूंचे अस्तित्व धोक्यात येत आहे. आज बांगलादेशातील हिंदूविरोधी हिंसाचाराचा इतिहास सोडून दिला, तरी वर्तमानात घडणार्या हिंदूंच्या कत्तलींकडे वा हिंदूविरोधी हिंसाचाराकडे दुर्लक्ष कसे करता येईल ? ‘या कत्तली बांगलादेशाचे अंतर्गत प्रकरण आहे’, असे म्हणून जगभरातील हिंदूंनी त्याकडे दुर्लक्ष करावे का ? जागृत हिंदु समाज असे दुर्लक्ष करू शकेल का ? हे आज कळीचे मुद्दे आहेत. धर्मनिरपेक्षतेच्या आवरणाखाली बांगलादेशात गेली ५० वर्षे सातत्याने हिंदूंची कत्तल चालू आहे. त्या अनुषंगाने बांगलादेश हिंदुद्वेष्टा कसा आहे, याविषयीचे विवेचन या लेखात देत आहे…

१. बांगलादेशात कोणत्याही कारणाने होणारा हिंसाचार हा नेहमीच हिंदुविरोधी !
सध्या आपला शेजारी बांगलादेश जगभरातील बातम्यांमध्ये वारंवार झळकत आहे. या देशाच्या तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांनी बांगलादेशाचे एक बेट (सेंट मार्टिन) अमेरिकेला वापरण्यासाठी देण्यास नाकारले. मग त्यानंतर त्या देशात आरक्षणविरोधी विद्यार्थी आंदोलन चालू झाले. ते चिघळत जाऊन त्याची परिणती एका हिंसक आंदोलनात झाली. जवळजवळ ३०० विद्यार्थी मारले गेल्याचा तेव्हाच्या बांगलादेश सरकारवर आरोप झाला. विद्यार्थी आंदोलनात मुसलमान मूलतत्त्ववादी लोकांनी चंचुप्रवेश करत ते आंदोलन ‘हायजॅक’ (कह्यात घेणे) केले. त्यानंतर आंदोलक विद्यार्थी आणि इस्लामी मूलतत्त्ववादी यांनी अजूनच बेभान होत आंदोलन अधिकच हिंसक केले. पोलीस आणि सैन्यदल यांनी बघ्याची भूमिका घेत लोकशाही मार्गाने निवडून आलेले शेख हसीना यांचे सरकार उलथवले. शेख हसीना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला. लागलीच आपल्या देशातून परागंदा होऊन अमेरिकेत जाऊन बसलेले तथाकथित अर्थतज्ञ महंमद युनूस यांच्या नेतृत्वात एक ‘काळजीवाहू सरकार’ तिथे स्थापन करण्यात आले; पण त्या देशातील हिंसाचार थांबला नाही. बांगलादेशातील घडामोडी जरी त्या देशाचे अंतर्गत प्रकरण असले, तरी या हिंसाचाराच्या मागे एक निश्चित असे सूत्र दिसून येते. वास्तविक अगदी देश म्हणून बांगलादेश अस्तित्वात येण्याअगोदरपासून तेथील हिंसाचाराच्या मागे हेच सूत्र दिसून येते. हे सूत्र म्हणजे प्रत्येक वेळी हिंदु समाजाला तिथे बहुसंख्य असलेल्या मुसलमान लोकांनी हिंसेचे लक्ष्य करणे होय. तेथील हिंसाचार हा नेहमीच हिंदूविरोधी हिंसाचार होता आणि आहे. सध्या चालू असलेला हिंदूविरोधी हिंसाचार आता तर टोकाला गेलेला आहे. (वर्ष १९७० च्या दशकातील बांगलादेश आंदोलनाच्या वेळीही पाकिस्तानी पंजाबी मुसलमान सैन्याने बांगलादेशी हिंदूंनाच प्रामुख्याने लक्ष्य केले होते, हे इथे लक्षात ठेवले पाहिजे.)

२. ‘इस्कॉन’चे चिन्मय प्रभु यांना अटक करण्याचे कारण
गेल्या अनेक वर्षांपासूनच तिथे हिंदु मंदिरांवर हिंसक आक्रमणे होत असल्याचे दिसून येते. सध्या चालू असलेल्या हिंसाचारात जगभरात पसरलेल्या ‘इस्कॉन’ संप्रदायाच्या मंदिरावर आक्रमण केले गेले आणि ‘इस्कॉनला आतंकवादी संघटना म्हणून घोषित करण्यात यावे’, अशी मागणी केली गेली. चिन्मय कृष्णदास प्रभु हे इस्कॉनशी संबंधित असलेले संन्यासी. त्यांनी ‘हिंदूंवरील आक्रमणे आणि हिंसाचार थांबवा’, या मागणीसाठी घटनात्मक अन् शांततापूर्वक बांगलादेशाची राजधानी ढाक्यात मोर्चा काढला. सहस्रोंच्या संख्येने तेथील हिंदु समाज या मोर्चात सामील झाला. ‘या मोर्चात बांगलादेशाच्या झेंड्यापेक्षा भगवा ध्वज उंच फडकत होता’, असा ठपका ठेवून चिन्मय कृष्णदास प्रभु यांना अटक केली गेली आणि तेथील सरकारचे प्रमुख असलेले महंमद युनूस हे बोलण्याच्या व्यतिरिक्त काही करू शकलेले नाहीत. तेथे हिंदूंचे अस्तित्व धोक्यात येतांना दिसत आहे. वर्ष १९७५ मध्ये बांगलादेशात एकूण लोकसंख्येच्या १३.५ टक्के असलेल्या हिंदु लोकसंख्येत घट होऊन वर्ष २०११ मध्ये तेथे हिंदु लोकसंख्या केवळ ८.५ टक्के उरलेली आहे. ‘गेल्या ५० वर्षांत त्या देशाच्या एकूण लोकसंख्येत दुपटीने वाढ झालेली असली, तरी हिंदूंची लोकसंख्या मात्र ७५ लाखांनी न्यून झाली’, असे त्याच देशाचा जनगणना अहवाल सांगतो.
३. बांगलादेशातील हिंसक आक्रमणे प्रामुख्याने हिंदु समाजावरच होणे
हिंदु समाज आज जगभर पसरलेला आहे. विविध देशांमध्ये हिंदु समाज व्यापार-व्यवसाय किंवा नोकरीच्या निमित्ताने गेल्या ४-५ पिढ्या स्थायिक झाला, तसाच तो बांगलादेशातही मागील काही पिढ्यांपासून नव्हे, सहस्रो वर्षांपासून स्थायिक आहे. गेल्या २ दशकांत ‘टेक्स्टाईल’ (वस्त्रोद्योग) आणि होजिअरी उद्योगातील अनेक भारतीय उत्पादकांनी बांगलादेशात स्वतःचे व्यवसाय केंद्र स्थापित करून तेथील स्वस्त मजुरी दराचा लाभ घेत मोठे उद्योग उभारले आहेत. त्यासह बांगलादेशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) वाढवण्यात भरीव योगदान दिलेले आहे. हे बहुतेक उत्पादक भारतीय हिंदु आहेत. तेथील हिंसक आक्रमणे ही प्रामुख्याने समाजाच्या खालच्या स्तरावरील हिंदू समाजावर होतांना दिसत आहेत. कोणत्याही संप, मोर्चा किंवा आंदोलनाचा थेट परिणाम हा हातावर पोट असणार्या समाजघटकावर सर्वप्रथम आणि सर्वांत हानीकारकरित्या होत असतो. ‘शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशातील ५० जिल्ह्यांमध्ये हिंदु समाजावर २०० हून अधिक आक्रमणे झाली आहेत’, असे त्या देशाचा अहवालच सांगतो. हिंसक आंदोलनात मृत्यू पडणारे बहुतेक हिंदू हे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्या दुर्बल घटकातील आहेत. ही आक्रमणे अशांत आणि अस्थिर परिस्थितीतही ज्यांना पोटासाठी घर सोडणे भाग पडते, अशाच गटातील लोकांवर केले जात आहेत.

४. भारतासह बांगलादेशात अस्थिरता निर्माण करण्याचे अमेरिकन ‘डीप स्टेट’चे षड्यंत्र
अमेरिकची गुप्तचर संघटना ‘सीआयए’, ‘डीप स्टेट’ (‘डीप स्टेट’ म्हणजे सरकारी अधिकारी आणि खासगी संस्था यांचे गुप्त जाळे. या व्यवस्थेच्या द्वारे सरकारी धोरणे खासगी संस्थांना अनुकूल बनवली जातात.) आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा ‘आय.एस्.आय.’ यांनी संगनमताने बांगलादेशातील शेख हसीना सरकार उलथून महंमद युनूस यांची तेथील ‘सरकारचा प्रमुख’ म्हणून नेमणूक केली, हे सत्य सर्व जगासमोर आता उघड झालेले आहे. या ‘डीप स्टेट’ला अशाच प्रकारची अस्थिरता भारतातही निर्माण करायची आहे, हेही आता लपून राहिलेले नाही. त्यामुळेच अमेरिकन मुत्सद्दी ग्रॅहॅम मेयर आणि गॅरी अपेलगार्थ हे भारतातील उपद्रवी असलेल्या फारूख अब्दुल्ला, असदुद्दीन ओवैसी आणि अन्य प्रांतीय नेत्यांना काही मासांपूर्वी भेटले होते. भारतात अस्थिरता निर्माण करण्याचे ‘डीप स्टेट’चे हे प्रयत्न वर्ष २०१९ पासूनच या देशात चालू आहेत. ‘सीएए’विरोधी (नागरिकत्व सुधारणा कायदाविरोधी) आंदोलन असो वा देहलीच्या सीमेवरील महिनोन्महिने चाललेले खलिस्तानी प्रवृत्तींनी आणि काही आंदोलनजीवींनी ‘हायजॅक’ (कह्यात घेतलेले) केलेले तथाकथित शेतकरी आंदोलन असो, त्यामागे अमेरिकन ‘डीप स्टेट’च्याच कारवाया होत्या, हेही आता सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. या देशात कुठल्या ना कुठल्या प्रकारे अस्थिरता निर्माण करण्यात यांना रस आहे.
(क्रमशः)
– डॉ. विवेक राजे
(साभार : साप्ताहिक ‘विवेक’, मराठी)
या लेखाचा या पुढील भाग वाचण्या करीता येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/868996.html
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड