फार्माकॉलॉजीचा अभ्यासक्रम उत्तीर्ण झाल्यावर मिळणार परवाना !
पुणे – राज्यात अनुमाने ९० सहस्र होमिओपॅथीचे डॉक्टर नोंदणीकृत आहेत. त्यापैकी केवळ २५ सहस्र डॉक्टरांनी राज्यशासनाचा मान्यता प्राप्त ‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ (सी.सी.एम्.पी.) अभ्यासक्रम उत्तीर्ण केला आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणार्या डॉक्टरांनाच ॲलोपॅथी औषधे देण्याची अनुमती असल्याचे अन्न आणि औषध प्रशासनाने नमूद केले आहे. राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त (औषध विभाग) राजेश नार्वेकर यांनी याविषयीचे परिपत्रक राज्यातील सर्व विभागीय सहआयुक्त (औषधे), साहाय्यक आयुक्त (औषधे) आणि औषध निरीक्षक यांना जारी केले आहे. ‘होमिओपॅथी डॉक्टरांनाही ॲलोपॅथीची ‘प्रॅक्टिस’ करण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी अनेक वर्षांपासून संघटनेकडून होत होती.
‘सी.सी.एम्.पी.’ अर्हताप्राप्त वैद्यकीय व्यावसायिक हा महाराष्ट्र वैद्यकीय परिषद अधिनियम १९६५ अन्वये वैद्यक व्यावसायिक या व्याख्येत समाविष्ट आहे. त्याला आधुनिक चिकित्सा पद्धतीची औषधे वापरून वैद्यकीय व्यवसाय करण्याची अनुमती देण्यात आलेली आहे.