केवळ क्षमा नाही, तर सर्वांना कारागृहात टाकणार ! – आमदार राम कदम, भाजप

भाजपचे आमदार राम कदम

मुंबई – ‘तांडव’ वेब सिरीजच्या विरोधात तक्रार नोंद करणारे भाजपचे आमदार राम कदम म्हणाले, ‘‘मुंबईतील ‘अ‍ॅमेझॉन’च्या कार्यालयात जाऊन ५ घंट्यांहून अधिक वेळ बैठक घेऊन दबाव टाकावा लागला. त्यानंतर ‘अ‍ॅमेझॉन’ला क्षमा मागावी लागली आहे; मात्र आता केवळ क्षमा मागून काम चालणार नाही, त्या सर्वांना (चित्रपटाचे दिग्दर्शक अली अब्बास जफर आणि देवतांचे विडंबन करणारे कलाकार) आम्ही कारागृहात पाठवल्याशिवाय रहाणार नाही.’’

यापूर्वी भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी मुंबईतील ‘अ‍ॅमेझॉन’च्या कार्यालयात जात अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. ‘अ‍ॅमेझॉनने क्षमा मागावी आणि वेब सिरीजचे फलक काढून टाकावेत’, अशी मागणी त्यांनी बैठकीत केली; मात्र ‘अ‍ॅमेझॉन’कडून त्यावर कोणतेही सकारात्मक उत्तर देण्यात आले नाही.

‘अ‍ॅमेझॉन प्लॅटफॉर्म’’वरून कोणतेही सामान खरेदी करू नका !

‘तांडव’ वेब सिरीजद्वारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावण्याचे काम झालेले आहे. जोपर्यंत ‘अ‍ॅमेझॉन’चे अधिकारी हिंदु समाजाची क्षमा मागत नाहीत, तोपर्यंत देशातील ‘अ‍ॅमेझॉन प्लॅटफॉर्म’वरून लोकांनी कोणतेही उत्पादन खरेदी करू नये. हिंदु समाजाच्या शक्तीचा अंदाज यावा, या उद्देशाने ‘अ‍ॅमेझॉन अ‍ॅप’देखील भ्रमणभाषमधून काढून टाकावे, असे आवाहन राम कदम यांनी केले आहे.