धार्मिक स्थळाची तोडफोड करून स्थानिकांच्या श्रद्धेवर घाला घालणार्या दोषी व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी

मोरजी, १५ एप्रिल (वार्ता.) – तायाचावाडा, किरणपाणी, पालये येथील बंद असलेल्या श्री आग्या वेताळ मंदिरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून आतील दानपेटीतील पैसे चोरले, तसेच गर्भकुडीतील देवाच्या वारुळाची तोडफोड केली. देवस्थानचे अध्यक्ष सत्यवान गडेकर यांनी याविषयी मांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
सत्यवान गडेकर यांनी तक्रारीत नमूद केल्यानुसार १३ एप्रिल या दिवशी सकाळी मंदिरात चोरी झाल्याचे लक्षात आले. चोरट्याने मंदिराच्या मुख्य दरावाजाला बसवलेल्या खिडकीचे गज काढून खिडकीतून मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला. त्या ठिकाणी देवाचे अस्तित्व असलेल्या वारुळाची तोडफोड केली आणि तेथील देवतांची छायाचित्रे अस्ताव्यस्त टाकली. तेथील दानपेटी चोरली. दानपेटीमध्ये सुमारे २ सहस्र रुपये होते. संशयिताने तेथील समई, लामण दिवा यांना हात लावला नाही. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार १२ एप्रिलच्या रात्री १०.४५ च्या सुमारास ५० वर्षांची देहयष्टीने उंच असलेली एक अज्ञात व्यक्ती या मंदिर परिसरात फिरत होती. त्याने लाल रंगाचा टी शर्ट आणि काळ्या रंगाची पँट घातली होती. याच इसमाने हे कृत्य केल्याचा स्थानिकांना संशय आहे. धार्मिक स्थळाची तोडफोड करून स्थानिकांच्या श्रद्धेवर घाला घालणार्या दोषी व्यक्तींवर मांद्रे पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून याविषयी अधिक अन्वेषण चालू आहे.