आज नागपूर येथे पंढरपूर ते लंडन आंतरराष्‍ट्रीय दिंडीचे आगमन !

नागपूर – काही वर्षांत पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर लंडन म्हणजेच युके येथे भव्यदिव्‍य स्‍वरूपात साकारले जाणार आहे. यानिमित्ताने १५ एप्रिल या दिवशी पंढरपूर ते लंडन अशी जगातील सर्वांत मोठी आंतरराष्ट्रीय दिंडी निघाली आहे. या दिंडीचे १६ एप्रिल या दिवशी नागपूर येथे आगमन होत आहे.

मुळचे नागपूरकर असलेले; पण युकेत स्थायिक झालेले उद्योजक श्री. तुषार गडीकर आणि श्री. अनिल खेडकर यांच्या पुढाकाराने हा प्रकल्प साकारण्यात येत आहे. यापैकी श्री. अनिल खेडकर हे पंढरपूर ते लंडन दिंडीचे नेतृत्व करत आहे. सायंकाळी ६ ते ९ या वेळात विष्‍णूजी की रसोई, बजाजनगर येथे दिंडीतील पादुका सर्वांच्‍या दर्शनासाठी ठेवल्‍या जाणार आहेत. त्यानंतर प्रसादवाटपाचा कार्यक्रम होईल, अशी माहिती मंदिर समितीचे भारतातील समन्‍वयक श्री. विष्णू मनोहर आणि श्री. मोहन पांडे यांनी दिली. नागपूर येथील पादुका आगमन आणि दर्शन आयोजनाच्या यशस्वीतेसाठी  श्री. प्रवीण मनोहर, श्री. मिलिंद देशकर, श्री. विजय जिथे, श्री. प्रवीण देशकर यांचे विशेष सहकार्य लाभत आहे.