Mumbai High Court In Marathi : मुंबई उच्च न्यायालयाचे दैनंदिन कामकाज मराठीतून चालणार !

 ७०० हून अधिक कायदे मराठीत करणार !

श्री. प्रीतम नाचणकर, प्रतिनिधी

मुंबई, १५ एप्रिल – मुंबई उच्च न्यायालयाचे नियमितचे कामकाज मराठीतून व्हावे, यासाठीच्या कामाला गती आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रशासनाचे जवळजवळ ४५० आणि राज्याचे जवळजवळ २५० असे इंग्रजी भाषेतील ७०० कायदे मराठीत भाषांतर केले जाणार आहेत.

१. न्यायालयांचे नियमितचे कामकाज स्थानिक भाषांतून व्हावे, हे केंद्रशासनाचे धोरण आहे; मात्र बहुतांश कायदे इंग्रजकालीन असल्याने इंग्रजीत आहेत.

२. वेळोवेळी या कायद्यांमध्ये सुधारणा करण्यात आली असली, तर अद्यापही या कायद्यांचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर करण्यात आलेले नाही. त्यामुळे न्यायालयांचे कामकाज स्थानिक भाषेत होण्याचे केंद्रशासनाचे धोरण असले, तरी जोपर्यंत कायद्यांचे स्थानिक भाषांमध्ये भाषांतर होत नाही, तोपर्यंत न्यायालयांचे कामकाज स्थानिक भाषांमध्ये होण्यात अडचणी येत आहेत.

३. मुंबई उच्च न्यायालयाचे कामकाज मराठीत होण्यासाठी प्रथम सर्व कायद्यांचे मराठीत भाषांतर होणे आवश्यक होते; मात्र हे भाषांतर करण्यासाठी मनुष्यबळ नसल्यामुळे हे काम मागील अनेक वर्षांपासून रखडले होते; मात्र ही अडचण सोडवण्यासाठी राज्यशासनाने प्रयत्न चालू केले आहेत.

भाषांतरासाठी १० पदे भरली जाणार !

इंग्रजी कायद्यांचे भाषांतर करण्यासाठी १० पदे निर्माण केली जाणार आहेत. या पदांची निर्मिती करण्यासाठी वित्त, सामान्य प्रशासन आणि मराठी भाषा या विभागांची उपसमिती स्थापन करण्यात आली आहे. या पदांवर कंत्राटी पद्धतीने नियुक्त्या करण्यात येणार आहेत. याविषयीचा शासन आदेश लवकरच काढला जाण्याची शक्यता आहे.

अशी होईल पुढील प्रक्रिया !

कायद्याचे भाषांतर झाल्यावर हे सर्व कायदे मराठी भाषा विभागाच्या मराठी भाषा संचालनालयाकडून पडताळले जातील. त्यानंतर केंद्रशासनाच्या मान्यतेनंतर महाराष्ट्रातील न्यायालयांमध्ये अधिकृतरित्या या कायद्यांचा उपयोग केला जाईल. ही सर्व प्रक्रिया होण्यासाठी साधारण दीड ते २ वर्षे इतका कालावधी लागण्याची शक्यता आहे.

सद्य:स्थितीत न्यायालयांचे बहुतांश कामकाज इंग्रजीतून होत आहे. त्यामुळे अनेकांना न्यायालयाचा निवाडा समजण्यास अडचण येते. न्यायालयांचे कामकाज मराठीतून झाल्यास त्याचा लाभ सर्वसामान्यांना होणार आहे, तसेच कायद्यांचे आकलन होणे आणि समजून घेणे सोपे होणार आहे.