रामराज्याच्या स्थापनेसाठी श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने देशभरात झाले ५०० ठिकाणी सामूहिक गदापूजन !

  • हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांचा उपक्रम

  • रत्नागिरी जिल्ह्यात २६ ठिकाणी झाले गदापूजन

जालगाव, ब्राम्हणवाडी येथील महालक्ष्मी मंदिरात गदापूजन

रत्नागिरी – जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २२ आणि महाराष्ट्र मंदिर  महासंघाकडून ४ ठिकाणी सामूहिक गदापूजन
श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २२ आणि महाराष्ट्र मंदिर महासंघाकडून ४ ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. यामध्ये विशेषत: युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

कार्यक्रमाचा शुभारंभ शंखनादाने झाला. सामूहिक प्रार्थना, गदापूजन विधी,  मारुतीची आरती, स्तोत्रपठण आणि ।। श्री हनुमते नम:।।  हा सामूहिक नामजप करण्यात आला. या वेळी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावेत ?’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने देशभरात गेली ३ वर्षे सामूहिक ‘गदापूजन’ कार्यक्रम यशस्वीपणे घेण्यात येत आहेत.

गदापूजनामागील भूमिका सांगतांना श्री. परेश गुजराथी

दापोली तालुक्यातील गव्हे येथील कार्यक्रमात‘गदापूजना’मागील भूमिका स्पष्ट करतांना हिंदु जनजागृती समितीचे श्री. परेश गुजराथी म्हणाले की, मारुतीरायांची ‘गदा’ हे केवळ युद्धातील अस्त्र नव्हे, तर ती धर्मरक्षणाचा संकल्प, अन्यायाविरुद्ध उभे रहाणे आणि भगवंताच्या कार्यासाठी अहर्निश झटण्याचे प्रतीक आहे. अयोध्येत श्री रामलल्ला विराजमान झाले आहेत, आता रामराज्य घडवण्याचे दायित्व आपल्या सर्वांवर आहे. हे कार्य हनुमानासारखे शौर्य, निष्ठा, त्याग आणि सामर्थ्य यांच्याशिवाय शक्य नाही; म्हणूनच या वर्षीही गदापूजनाच्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत करण्याचा आणि रामराज्याच्या दिशेने सामूहिक वाटचाल करण्याचा निर्धार करायचा आहे.’