Don’t Hate Sanatan Sanstha : सनातन संस्थेचा द्वेष करण्यापेक्षा तिचे कार्य पहा ! – वीजमंत्री सुदिन ढवळीकर

  • तथाकथित पुरोगामी जवाहर बर्वे यांनी उधळली सनातन संस्थेविषयी मुक्ताफळे !

  • बर्वे यांनी पुन्हा टीका करायला चालू केल्यावर श्री. ढवळीकर कार्यक्रम सोडून निघून गेले !

वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर

पणजी : ‘समाजोन्नती संघटना’च्या वतीने पणजी येथे मिनेझिस ब्रागांझा सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात तथाकथित पुरोगामी आणि सनातनद्वेष्टे जवाहर बर्वे यांनी सनातन संस्थेवर अज्ञानमूलक टीका केली. त्यांच्या या टिकेचे वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर यांनी त्याच व्यासपिठावरून खंडन केले. त्यानंतर जवाहर बर्वे पुन्हा निलाजरेपणाने स्वतःचे म्हणणे मांडायला लागल्यावर वीजमंत्री ढवळीकर कार्यक्रम सोडून निघून गेले.

(म्हणे) ‘सनातनच्या आश्रमात महिला घटस्फोट घेऊन आल्या आहेत !’ – बर्वे

हेच ते पत्रकार जवाहर बर्वे !

जवाहर बर्वे यांनी त्यांचा सनातन संस्थेला विरोध करतांनाचा वर्ष १९९७ मधील एक प्रसंग सांगितला आणि त्यानंतर ‘सनातनच्या आश्रमात काही महिला रहातात, त्या घटस्फोट घेऊन आलेल्या असतात’, असे सांगितले. ऐकीव गोष्टीवरून त्यांनी हे भाष्य केल्याचेही ते म्हणाले. त्यानंतर वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे प्रमुख पाहुणे या नात्याने भाषण झाले. त्यांच्या भाषणात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राज्यघटना याविषयी भाष्य केल्यानंतर जवाहर बर्वे यांच्या सनातन संस्थेवरील अज्ञानमूलक टिकेचे खंडन केले.

(सौजन्य : prudentmediagoa)

गेली २५ वर्षे सनातनचे कार्य मी पहात आहे ! – ढवळीकर

श्री. ढवळीकर म्हणाले,

‘‘जवाहर बर्वे यांना सनातन संस्थेबद्दल काही ठाऊक नाही. सनातनच्या आश्रमात रहाणार्‍या महिलांना ‘घटस्फोटित’ म्हणून त्यांनी त्या महिलांचा अपमान केला आहे. माझ्या मतदारसंघात या संस्थेचा आश्रम आहे. गेली २५ वर्षे त्यांचे अध्यात्माचे कार्य मी पहातो आहे. खरे म्हणजे हे व्यासपीठ अशा गोष्टींविषयी बोलायचे नाही; पण बर्वे बोलल्यामुळे मला बोलावे लागले. हा विषय काढल्याबद्दल मी तुमची सर्वांची क्षमा मागतो; पण आयोजकांची मागत नाही. सनातन संस्थेचे कार्य पहा. उगाच त्यांचा द्वेष करू नका. बर्वे यांना काहीही ठाऊक नाही. येत्या मे महिन्यात १७ मे या दिवशी त्यांचा फर्मागुडी येथील गोवा अभियांत्रिकी विद्यालयाच्या मैदानात मोठा कार्यक्रम होणार आहे. त्याला १ लाख लोक येतील.’’

‘सनातनचा अपप्रचार करणार्‍यांसमवेत राहू शकत नाही’, असे सांगत श्री. ढवळीकर कार्यक्रमातून उठून गेले !

‘शंभू भाऊ बांदेकर यांनी मला या कार्यक्रमाला बोलावले याबद्दल मी त्यांचा आभारी आहे’, असे सांगून वीजमंत्री श्री. सुदिन ढवळीकर बसल्यावर जवाहर बर्वे पुन्हा उठून उभे राहिले आणि त्यांनी पुन्हा सनातनच्या विरोधात त्यांचे मत मांडले. हा प्रकार पाहून ‘सनातन संस्थेचा अपप्रचार करणार्‍यांसमवेत मी राहू शकत नाही’, असे सांगून ते कार्यक्रमातून उठून निघून गेले.

मुख्यमंत्र्यांवरील टिकेचाही ढवळीकर यांच्याकडून आक्षेप !

एका वक्त्याने मये गावच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर टीका केली. त्यालाही मंत्री ढवळीकर यांनी आक्षेप घेतला. ‘मी उपस्थित असतांना मुख्यमंत्र्यावर टीका सहन करू शकत नाही’, असे ते म्हणाले.

सत्कारमूर्ती श्री. संगम गोविंद भोसले यांची यावर प्रतिक्रिया पहा –

(सौजन्य : Unique Achievers)

संपादकीय भूमिका

सनातन संस्थेची मानहानी करणार्‍या पुरो(अधो)गाम्यांचा परखडपणे समाचार घेणारे वीजमंत्री श्री. ढवळीकर यांचे सनातनच्या वतीने आभार !