गोवा पोलिसांची अमली पदार्थांच्या विरोधात सर्वांत मोठी कारवाई
पणजी, १५ एप्रिल (वार्ता.) – चिकोळणा, मुरगाव येथे गोवा पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने तब्बल ४३ कोटी २० लाख रुपये किमतीचे ४ किलो ३२५ ग्रॅम कोकेन कह्यात घेतले आहे. गोवा पोलिसांनी आतापर्यंत अमली पदार्थांच्या विरोधात केलेली ही सर्वांत मोठी कारवाई आहे. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने तिबू, विन्सेंट उपाख्य विल्सन (वय ४५ वर्षे, रहाणारा बायणा, वास्को आणि मूळचा कोलकाता), मंगेश वडेकर आणि त्याची पत्नी सौ. रेश्मा वडेकर (दोघेही रहाणारे सडा, वास्को) यांना कह्यात घेतले आहे. १४ एप्रिलच्या उत्तररात्री १.५० वाजता ही कारवाई करण्यात आली. सर्व संशयितांना वास्को येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात उपस्थित केले असता त्यांना पोलीस कोठडी ठोठावण्यात आली.
गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता आणि उपअधीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक लक्षी आमोणकर, निरीक्षक प्रशाल देसाई, उपनिरीक्षक प्रगती मळीक, पोलीस हवालदार नवीन पालयेकर, सैमुल्ला मकानदाय, सुजय नाईक, संकल्प नाईक, राहुल नाईक, महिला पोलीस हवालदार रोशनी शिरोडकर आणि गृहरक्षक नितम खोत यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ व्यावसायिकांचा सहभाग असण्याची शक्यता
पोलीस अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयितांना कोकेन २८ चॉकलेट वेफर्सची पाकिटे आणि ४ कॉफीची पाकिटे यांमध्ये लपवून ठेवले होते. हे अमली पदार्थ वडेकर दांपत्याकडे गेले १० ते १५ दिवस होते. संशयितांचे हे अमली पदार्थ स्थानिक स्तरावर विकायचे नियोजन होते. संशयित रेश्मा वडेकर यांनी हल्लीच थायलंड दौरा केला होता आणि यामुळे या प्रकरणी आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ व्यावसायिकांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. दोन्ही संशयित मंगेश वडेकर आणि त्याची पत्नी रेश्मा वडेकर यांची पार्श्वभूमीही गुन्हेगारी स्वरूपाची आहे. संशयित मंगेश वडेकर हा सडा येथील स्मशानभूमीत काम करतो आणि त्याच्यावर एका युवतीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे, तसेच सौ. रेश्मा वडेकर यांचा वेश्याव्यवसायाशी संबंध आहे.
३ मासांत तब्बल ५५ कोटी रुपयांचा साठा कह्यात
गुन्हे अन्वेषण विभागाने चालू वर्षी मागील ३ मासांत आतापर्यंत एकूण ८ प्रकरणांमध्ये सुमारे १९ किलो २३६ ग्रॅम (बाजारी मूल्य ५५ कोटी २७ लाख ६४ सहस्र रुपये) अमली पदार्थ कह्यात घेतले आहे, तसेच ९ संशयितांना कह्यात घेतले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून अभिनंदन !

या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अमली पदार्थांच्या विरोधात आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई केल्याच्या प्रकरणी गोवा पोलिसांचे अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, ‘‘प्रभावी तांत्रिक देखरेख आणि अचूक कारवाई यांमुळे संशयितांना कह्यात घेण्यात आले. ही कारवाई म्हणजे सरकार अमली पदार्थांच्या विरोधात लढाईसाठी वचनबद्ध असल्याचे सिद्ध होते. या कारवाईत सहभागी पथकातील सर्व कर्मचारी अभिनंदनास पात्र आहेत.’’