‘भारत रक्षा मंच’च्या वतीने पुणे येथे व्याख्यान सोहळा पार पडला !

पुणे – दिवसेंदिवस हिंदु समाज हलालच्या समांतर अर्थव्यवस्थेचा भाग बनत चालला आहे. यातून बाहेर पडण्यासाठी अधिकाधिक हिंदूंनी विविध व्यवसायांत उतरणे आवश्यक आहे. हिंदूंची ‘इकोसिस्टम’ (इकोसिस्टम म्हणजे एखादी विचारसरणी पद्धतशीरपणे पुढे रेटणारी यंत्रणा) आणि त्यातून सशक्त होणारी ‘हिंदु इकॉनॉमी’ महत्त्वाची आहे, असे मार्गदर्शन भारत रक्षा मंचाचे राष्ट्रीय संघटन मंत्री श्री. प्रशांत कोतवाल यांनी केले. येथील डेक्कन परिसरातील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहा’त १३ एप्रिल या दिवशी ‘भारत रक्षा मंच’ आयोजित व्याख्यान सोहळा पार पडला. त्या वेळी ते बोलत होते.

भारत रक्षा मंचाचे राष्ट्रीय संयोजक श्री. सूर्यकांत केळकर, राष्ट्रीय संघटन मंत्री श्री. प्रशांत कोतवाल आणि हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. या वेळी हिंदु समाजाच्या समोरील ज्वलंत प्रश्नांवर ऊहापोह करण्यात आला. कार्यक्रमाचा आरंभ भारतमाता आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाला.
अर्बन नक्षली देशाची अंतर्गत सुरक्षितता धोक्यात आणत आहेत ! – पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती
पांढरपेशा समाजात राहून अर्बन नक्षली देशाची अंतर्गत सुरक्षितता धोक्यात आणत आहेत. शाळा-महाविद्यालयामधील तरुण मुलांना लक्ष्य करून तेथूनच अर्बन नक्षलवादाची पेरणी नवीन पिढीत केली जाते. जिहादी विचारसरणीचे लोक, नक्षलवादी आणि डाव्या विचारसरणीचे लोक यांची एकत्र इकोसिस्टम देशाच्या अंतर्गत सुरक्षेला गंभीर आव्हान देत आहे.
कार्यक्रमाच्या आरंभी श्री. शिवराय कोल्हटकर यांनी भारतीय इतिहास, संस्कृती यांचा उल्लेख असलेल्या गीतातून ‘देश कसा पालटत आहे ?’ अशा आशयाचे गीत सादर केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्रोत्यांसमवेत प्रश्नोत्तरेही झाली. कार्यक्रमाची सांगता ‘भारत रक्षा मंचा’च्या सौ. उर्मिला मराठे यांच्या आवाजात संपूर्ण ‘वन्दे मातरम्’ गीताने झाली.
संपूर्ण भारतातील लोकसंख्येचे प्रमाण बिघडवण्याचे षड्यंत्र ! – सूर्यकांत केळकर, भारत रक्षा मंच, राष्ट्रीय संयोजक

‘बांगलादेशीय घुसखोरी : समस्या आणि समाधान’ यावर बोलतांना श्री. सूर्यकांत केळकर यांनी सांगितले की, वर्ष २०१० मध्ये ‘भारत रक्षा मंचा’ची स्थापना प्रामुख्याने याच समस्येवर कार्य करण्यासाठी झाली. बांगलादेशाच्या निर्मितीपासून भारतात घुसखोरी केली जाते. घुसखोरांना भारतीय कागदपत्रांचे खोटे दस्तावेज पुरवणारी यंत्रणा, तसेच आसाम, बंगाल यांसारख्या सीमावर्ती राज्यांतील मुसलमान मतपेढी आणि वाढीव मतांच्या स्वार्थासाठी सर्वपक्षीय राजकीय पक्षांचे घुसखोरीकडे होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष हे महत्त्वाचे सूत्र आहे. हा केवळ बांगलादेशाच्या सीमावर्ती राज्यातील प्रश्न नसून संपूर्ण भारतातील लोकसंख्येचे प्रमाण बिघडवण्याचे षड्यंत्र आहे. यावर उपाय म्हणून मोदी सरकारने वर्ष २०१४ नंतर बांगलदेशाच्या सीमेवर तारेचे कुंपण घालण्याचे काम हाती घेतले. सीमावर्ती भागातील भारतियांनी थोड्या पैशांच्या मोबदल्यात या घुसखोरांचा प्रवेश सुखकर करण्याचे पाप करू नये.