पणजी, १५ एप्रिल (वार्ता.) – कोलवाळ मध्यवर्ती कारागृहात बंदीवानांकडूनच अमली पदार्थांचा व्यवसाय केला जात असल्याचा संशय तेलंगाणा राज्यातील भाग्यनगर पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाला आहे. अमली पदार्थ व्यवहारांशी संबंधित विविध प्रकरणांचे अन्वेषण करतांना भाग्यनगर अमली पदार्थविरोधी विभागाच्या अधिकार्यांनी गोव्याच्या पोलिसांच्या सहकार्याने कोलवाळ मध्यवर्ती कारागृह परिसराची तपासणी केली असता १६ भ्रमणभाष संच कह्यात घेण्यात आले होते. कारागृहात काही आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्कर शिक्षा भोगत असून ते या भ्रमणभाषचा वापर करून अमली पदार्थांचा व्यवसाय करत असल्याचा भाग्यनगर पोलिसांना संशय आहे.
भाग्यनगर येथे पुरवण्यात येणारे अमली पदार्थ हे गोव्यातून पुरवले जातात, असा भाग्यनगर पोलिसांचा जुना दावा आहे. त्यासंदर्भात भाग्यनगर पोलिसांनी यापूर्वी गोव्यातील काही जणांची धरपकडही केली होती. आता कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातून हा व्यवहार हाताळला जात असल्याचा दावा भाग्यनगर पोलिसांनी केला आहे. भाग्यनगर पोलिसांच्या मते वर्ष २०२२ पासून कारागृहात असलेला एक प्रमुख आंतरराष्ट्रीय तस्कर भाग्यनगर येथे अमली पदार्थांच्या वितरणाचे नियोजन करत होता. तो कारागृहात असूनही आंतरराष्ट्रीय व्हॉट्सॲप क्रमांकाचा वापर करत होता. अमली पदार्थ विकत घेऊ इच्छिणार्या व्यक्तींना हा व्हॉट्सॲप क्रमांक दिला जात होता. कारागृहातील एका बंदीवानाने पैसे दिल्याची पुष्टी करणारा ‘स्क्रीनशॉट’ प्राप्त केल्यावर भाग्यनगर येथील त्याचे साथीदार वितरणाची कार्यवाही करत असत. तसेच बँकिंग व्यवहाराची तपासणी केल्यानंतर पोलिसांनी काही मासांपूर्वी ५ जणांना कह्यात घेतले होते. गोव्यातील कारागृहात असलेला मुख्य आरोपी इतर कारागृहातील इतर गुन्हेगारांना जामीन मिळवण्यासाठी साहाय्य करत होता आणि त्याच्या बदल्यात हे बंदीवान अमली पदार्थ पुरवण्याचे काम करत होते. कोलवाळ कारागृहात कह्यात घेतलेले १६ भ्रमणभाष संच नेमक्या कोणत्या बंदीवानांचे आहेत, हे स्पष्ट न झाल्यामुळे कोणत्याही बंदीवानांवर गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही. या भ्रमणभाषच्या आधारे विदेशातून अमली पदार्थ मागवून पुण्यातील साथीदारांपर्यंत पोचवले जात होते. हे साथीदार कारागृहात असलेले आरोपी आणि परदेशातील व्यक्ती यांच्या सूचनेवरून काम करत होते. भ्रमणभाष कह्यात घेतल्याने देशाच्या अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील अमली पदार्थ तस्कर यांचे कारागृहातील संपर्क तुटले आहेत.
संपादकीय भूमिकाजे भाग्यनगर येथील पोलिसांना समजते, ते गोव्यातील कारागृह रक्षकांना का समजत नाही ? त्यांचे अमली पदार्थ व्यवहार करणार्या गुन्हेगारांशी साटेलोटे आहे, असे समजायचे का ? |