रत्नागिरी जिल्ह्यातील ७ सहस्र ७५३ बहिणी लाडक्या होण्यास अपात्र !

  • लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची होत आहे छाननी !

  • योजनेअंतर्गत अनेक अटींचे झाले आहे उल्लंघन !

रत्नागिरी – राज्यात सर्वत्र ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांची छाननी चालू झाली आहे. या छाननीत अनेक महिला अपात्र ठरल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातीलही महिलांचा समावेश असून या योजनेअंतर्गत ७ सहस्र ७५३ महिला अपात्र ठरल्या आहेत. आता मार्च महिन्यापासून या योजनेचा लाभ त्यांना मिळणार नाही. यामुळे सरकारचे अनुमाने १ कोटी १६ लाख २९ सहस्र ५०० रुपये वाचणार आहेत.

राज्यातील महायुती शासनाने लाडकी बहीण योजना घोषित केली. त्यानंतर या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांकडून अर्ज मागवण्यात आले. या योजनेनुसार १ सहस्र ५०० रुपये या योजनेतून लाभार्थी महिलांना दिले जात होते. जिल्ह्यात या योजनेकरता अनुमाने ४ लाख १२ सहस्र ७७४ इतक्या लाभार्थी महिला पात्र ठरल्या होत्या. आता शासनाने या योजनेच्या लाभार्थींची छाननी चालू केली आहे.

या योजनेअंतर्गत अनेक अटी होत्या; मात्र अटींचे उल्लंघन करून ज्यांनी अन्य योजनेचा लाभ घेतला, अशा ७ सहस्र ७५३ महिला जिल्ह्यात आढळल्या आहेत.

यामध्ये काही बहिणी अन्य शासकीय योजनांचा लाभ घेणार्‍या आहेत. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेणार्‍या आणि लाडकी बहीण योजनेचाही लाभ घेणार्‍या २ सहस्र ७६२ महिला आढळल्या. चारचाकी असलेल्या १ सहस्र ३५० बहिणी आढळल्या. ६५ वर्षांवरील १ सहस्र ३८७ बहिणी लाभ घेतांना आढळल्या. अनेक नव्या शेतकरी योजनांच्या लाभार्थी २ सहस्र २५४ लाभार्थी महिला आढळल्या आहेत.


आता या योजनेतील लाभार्थी असणार्‍या उर्वरित बहिणींना आधारकार्ड लिंक करून घ्यावे लागणार आहे. ज्या बँकेत खाते आहे, त्या बँकेत हे कार्ड लिंक करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

  • असे अप्रामाणिक लाभार्थी असल्यास सरकारची एक तरी योजना कधी यशस्वी होईल का ? धनाच्या हव्यास असणारी जनता असणे, हे सर्वपक्षीय निधर्मीवादी आणि भ्रष्ट शासनकर्त्यांचीच देण होय !
  • ‘शासनकर्ता धर्माचरणी असल्यासच समाजही सदाचारी आणि चारित्र्यसंपन्न असेल’, असे शास्त्रांमध्ये म्हटले आहे. त्यामुळे त्यागी आणि धर्माचरणी समाज निर्माण होण्यासाठी हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता यातून लक्षात येते !