पुणे – येथे ‘इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन’कडून (आय.आर्.सी.टी.सी.) चालू करण्यात आलेल्या पर्यटन रेल्वे सेवेअंतर्गत ‘उत्तर भारत देवभूमी यात्रा गुरुकृपा’सह ही विशेष रेल्वे येत्या १७ एप्रिलपासून पुणे येथून सोडण्यात येणार आहे. ही यात्रा ५ सहस्र कि.मी. अंतराची असून हरिद्वार, हृषीकेश, अमृतसर, वैष्णोदेवी (कटरा), मथुरा, वृंदावन आणि आग्रा यांसारख्या महत्त्वाच्या धार्मिक अन् सांस्कृतिक स्थळांना भेट देऊन १० दिवसांनी ती पुन्हा पुण्यात येणार आहे. ‘प्रथम येणार्यास प्राधान्य’ या तत्त्वानुसार आरक्षण करण्यात येणार असून ७५० आसनक्षमता निश्चित करण्यात आली आहे. इच्छुकांना पुणे, लोणावळा, कर्जत, कल्याण, वसई रस्ता, वापी, सूरत, बडोदा या रेल्वेस्थानकांवरून रेल्वेत बसता येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
केंद्रशासनाच्या ‘देखो अपना देश’ या योजनेंतर्गत ‘भारतगौरव’ ही विशेष रेल्वे सेवा चालू करण्यात आली आहे. या सेवेद्वारे देशभरातून आतापर्यंत ८६ गाड्या सोडण्यात आल्या आहेत. जानेवारीमध्ये उत्तरप्रदेशमधील प्रयागराज येथील महाकुंभनिमित्त ‘भारत गौरव’ची विशेष रेल्वे सोडण्यात आली होती. या रेल्वेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. त्याच धर्तीवर या विशेष यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.