
रत्नागिरी – भारतीय संस्कृती जगविख्यात आहे. याच संस्कृतीत अनेकानेक क्रांतीकारक, समाजसेवक जन्माला आले, ज्यांनी या देशाकरता जीवन वेचले. भारत हा ऋषी आणि कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे योगाचा प्रसार हा जगभरात झाला आहे. अशा परंपरेने प्राप्त सर्वांगसुंदर योग केल्यास जीवनाचा उत्कर्ष होऊ शकतो, असे गौरवोद्गार पतंजलि योगपिठाचे मुख्य केंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांनी काढले.
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे भारतरत्न डॉ. पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन उपकेंद्र आणि पतंजलि परिवाराच्या संयुक्त विद्यमाने ‘उपनिषदातील योगविद्या’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.
या वेळी डॉ. स्वामी परमार्थदेव यांचे स्वागत आणि मानपत्र देऊन सत्कार रत्नागिरी उपकेंद्राचे संचालक डॉ. दिनकर मराठे यांनी केला. याप्रसंगी पतंजलि समितीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या सौ. रमाताई जोग उपस्थित होत्या.
डॉ. स्वामी परमार्थदेवजी पुढे म्हणाले की,

१. भारत देश हा अध्यात्माचे केंद्र आहे. आपली सनातन, वैदिक जी परंपरा आहे. याच परंपरेतील योगविद्या आहे. अनुशासन, व्यवस्था, संतुलन म्हणजे योग असून जिथे योग नाही तिथे निश्चित रोग असणारच.
२. योगाचे ज्ञान वेद – पुराणांसमवेत आपणा सर्वांना ज्ञात असणारे उपनिषदसुद्धा योगविषयक ज्ञानाने परिपूर्ण आहे. निश्चयपूर्वक गुरूंच्या जवळ जाऊन जी विद्या ग्रहण केली जाते ती म्हणजे उपनिषद होय.
३. ईशावास्योपनिषदामध्ये कर्मयोग आणि ज्ञानयोग सांगितला आहे. कठोपनिषदामध्येसुद्धा म्हटले आहे की, आपले जन्मोजन्मांतरीचे कुसंस्कार दोष समूळ नष्ट करण्याची ताकद योगात आहे. त्यामुळे या आधुनिक काळात वावरतांना प्रत्येक ठिकाणी राम दिसेल, अशी सुदृष्टी असणे आवश्यक आहे. भक्तीपूर्वक जीवन जगणे हेच खरे योगाचे ध्येय आहे.
या वेळी श्रोत्यांच्या प्रश्नांनाही डॉ. स्वामी परमार्थदेवजी यांनी समर्पक उत्तरे दिली. कार्यक्रमाला प्रमुख प्रेरणा संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरु प्रो. हरेराम त्रिपाठी यांची लाभली. शिवाय पतंजलि रत्नागिरी परिवारच्या एकत्रित सहकार्याने हा कार्यक्रम झाला.