प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे बंदीवानाचा कारागृहात मृत्यू झाल्यास भरपाई द्यावी लागणार !

प्रतिकात्मक छायाचित्र

मुंबई – प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे राज्यातील कारागृहांमध्ये बंदीवानांचा अनैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याविषयी संबंधित बंदीवानाच्या कुटुंबियांना प्रशासनाला हानीभरपाई द्यावी लागणार आहे. राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याविषयीचे धोरण १५ एप्रिलला घोषित करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रीमंडळाची बैठक पार पडली.

या धोरणानुसार कारागृहामध्ये काम करतांना अपघात, पोलिसांची मारहाण, बंदीवानांतील आपापसांतील मारहाण आदींमुळे बंदीवानाचा मृत्यू झाल्यास आणि अन्वेषणात हे निष्पन्न झाल्यास बंदीवानांच्या वारसांना ५ लाख रुपये द्यावे लागणार आहेत. कारागृहात बंदीवानाने आत्महत्या केल्यास त्यांच्या वारसांना १ लाख रुपये हानीभरपाई द्यावी लागणार आहे. राज्यातील सर्व कारागृहांमध्ये हे धोरण लागू रहाणार आहे. वार्धक्य, दीर्घ आजार, कारागृहातून पलायन करतांना अपघातात, जामिनावर असतांना किंवा उपचार नाकारल्यास बंदीवानाचा मृत्यू झाल्यास कोणतीही हानीभरपाई दिली जाणार नाही.