सद्यःस्थितीत अग्नीशमन सेवेचे कार्य आव्हानात्मक ! – सी.पी. राधाकृष्णन्, राज्यपाल

राज्यातील ८ अग्नीशमन अधिकारी आणि जवान यांना ‘राष्ट्रपती’ पदके प्रदान

मुंबई – वाढती लोकसंख्या, महानगरांची उर्ध्व दिशेने होणारी वाढ, तसेच वाढती औद्योगिक क्षेत्रे यांमुळे आग आणि इतर आपत्तींना तोंड देणे आव्हानात्मक झाले आहे. रसायनांमुळे उद्भवणार्‍या आगी, औद्योगिक अपघात, नैसर्गिक संकट, तसेच अतिरेकी आक्रमणांमुळे अग्नीशमन दलासमोर विविध आव्हाने आहेत. या परिस्थितीत अग्नीशमन सेवा दलापुढे पायाभूत सेवा-सुविधांचे रक्षण करणे, सार्वजनिक ठिकाणांची सुरक्षा जपणे आणि औद्योगिक संपदेचे संरक्षण करणे हे महत्त्वाचे दायित्व आले आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन् यांनी येथे केले. नैसर्गिक संकट राष्ट्रीय अग्नीशमन दिनानिमित्त राज्यस्तरीय अग्नीशमन सेवा सप्ताहाचा शुभारंभ राज्यपालांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन मुंबई येथे अग्नीशमन दलमुंबईकरण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते.

मुंबई अग्नीशमन दलातील, तसेच राज्याच्या इतर महानगरपालिका येथील ८ अग्नीशमन अधिकारी आणि कर्मचारी यांना या वेळी राज्यपालांच्या हस्ते गुणवत्तापूर्ण अग्नीशमन सेवेसाठी घोषित झालेले ‘राष्ट्रपती’ पदक प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला मुंबई अग्नीशमन दलाचे, औद्योगिक आस्थापनांचे, तसेच महाराष्ट्र अग्नीशमन सेवेतील वरिष्ठ अग्नीशमन अधिकारी उपस्थित होते.

मुंबई डॉकयार्ड येथे सन १९४४ साली झालेल्या जहाजावरील स्फोटात प्राण गमावलेल्या अग्निशमन अधिकारी व जवानांच्या स्मरणार्थ १४ एप्रिल हा दिवस राष्ट्रीय अग्नीशमन सेवा दिवस पाळला जातो, तसेच या दिवसापासून अग्नीशमन सप्ताह पाळला जातो.