सिंधुदुर्ग जिल्ह्यात बांधकाम साहित्य आणि मंदिरांतील घंटा चोरणार्‍या टोळीचा पर्दाफाश !

  • स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाची कारवाई

  • ८ जणांना अटक, अन्य ४ जणांचा शोध चालू 

  • ६ वाहने घेतली कह्यात

सावंतवाडी – बांधकाम साहित्यासह मंदिरांतील घंटा आदींची चोरी केल्याच्या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ८ जणांना अटक केली आहे, तर अन्य ४ जणांचा पोलीस शोध घेत आहेत. या प्रकरणात पथकाने ३ बोलेरो पिकअप, २ चारचाकी आणि १ दुचाकी अशी एकूण ६ वाहने कह्यात घेतली आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोडामार्ग, सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आणि कुडाळ येथील बांधकाम व्यावसायिकांच्या साहित्याची चोरी केली जात होती. या परिसरातील मंदिरांतील घंटाही चोरी करण्यात येत होत्या. विशेष म्हणजे कारिवडे येथे डुक्करांची चोरी करण्याचे प्रमाण वाढले होते. या सगळ्या घटनांची चौकशी करत असतांना एक मोठी टोळी कार्यरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार कारवाई करून पोलिसांनी सनी सत्यवान पवार आणि अली साबीर खान ( दोघे रहाणार कोलगाव), प्रथमेश गुरुदेव सावंत (रहाणार माडखोल-धवडकी), आर्यन अमित सुभेदार आणि आयान जुबेर शेख (दोघे रहाणार सालईवाडा, सावंतवाडी), अमित मधुकर मुंज (रहाणार माणगाव), अमर मारुति धोत्रे (रहाणार कारिवडे), आतिफ रीसाज काजरेकर (रहाणार बाहेरचावाडा, सावंतवाडी) या ८ जणांना अटक केली. यांच्या खेरीज सनी उपाख्य सन्या पाटील (रहाणार लाखेवस्ती, सावंतवाडी), रविशंकर लाखे आणि बाबू गावडे (दोघे रहाणार जिमखाना मैदान, सावंतवाडी), इमरान शेख आणि अहमद नासीर शेख (दोघे रहाणार मोरडोंगरी, सावंतवाडी) यांचा पथक शोध घेत आहे. प्राथमिक चौकशीत संशयितांनी गुन्हा मान्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.