देहली, १६ जानेवारी (वार्ता.) – अल्पावधीतच देशभरातील हिंदुत्वनिष्ठांचे आधारवड असलेले आणि हिंदुत्वाच्या क्षेत्रात दीपस्तंभाप्रमाणे कार्य करणारे ‘सनातन प्रभात’ आज यशस्वीपणे घोडदौड करत आहे. हिंदी भाषेतील ‘पाक्षिक सनातन प्रभात’च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त मी शुभेच्छा व्यक्त करतो. हिंदु राष्ट्राची स्थापना, राष्ट्र-धर्माविषयी दिशादर्शन करणारी वृत्ते, हिंदूंच्या समस्यांना आणि हिंदु धर्मावरील आघातांना वाचा फोडणे यांसह विविध कार्य ‘सनातन प्रभात’कडून अविरतपणे चालू आहे. यांद्वारे ‘सनातन प्रभात’ समस्त हिंदुत्वनिष्ठांचा आधारस्तंभ झाला आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ यांनी केले.
हिंदी पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या अंकाचे प्रकाशन
‘पाक्षिक सनातन प्रभात’च्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त १६ जानेवारी या दिवशी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी ‘सनातन प्रभात’च्या राष्ट्र-धर्माच्या कार्यातील योगदानाविषयी विस्तृत सूत्रे मांडली. या कार्यक्रमात बंगाल येथील ‘ट्रुथ’चे संपादक आणि शास्त्र धर्म प्रचार सभेचे पू. (डॉ.) शिवनारायण सेन आणि ‘सनातन प्रभात’चे साहाय्यक संपादक श्री. चेतन राजहंस हे उपस्थित होते. या कार्यक्रमात राष्ट्राभिमान, धर्माभिमान, भाषाभिमान आणि धर्मशिक्षण यांचा संगम असलेल्या पाक्षिक ‘सनातन प्रभात’च्या धर्मसंस्थापनेतील कार्याचा उहापोह करण्यात आला. या कार्यक्रमाचे फेसबूक आणि यू ट्यूब प्रणालीद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात आले. कार्यक्रमाला ऑनलाईन उपस्थित असणार्या धर्मप्रेमींनी ‘सनातन प्रभात’च्या कार्यातून प्रोत्साहित होऊन राष्ट्र-धर्माच्या कार्यात कृतीशील सहभाग घेणार असल्याचे सांगितले.
(वर्धापनदिन सोहळ्याचे सविस्तर वृत्त वाचा लवकरच…)